Historic action against those who violate party discipline : पक्षशिस्त मोडणाऱ्यांवर ऐतिहासिक कारवाई
Nashik : महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच भाजपने शहराच्या राजकारणात खळबळ उडवणारी कठोर कारवाई करत माजी महापौरांसह तब्बल 54 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. उमेदवारी न मिळाल्याने भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करून अपक्ष किंवा इतर पक्षांकडून निवडणूक लढवणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली असून, नाशिक भाजपच्या इतिहासातील ही सर्वात मोठी संघटनात्मक कारवाई मानली जात आहे.
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत पक्षशिस्त धाब्यावर बसवत अधिकृत उमेदवारांविरोधात उभे राहणाऱ्या 20 माजी नगरसेवकांसह एकूण 54 जणांना भाजपने थेट बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या यादीत माजी महापौरांचाही समावेश असल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या निर्णयामुळे भाजपमधील अंतर्गत असंतोष चव्हाट्यावर आला आहे.
Mehkar Municipal Council : ११ शाळा, ११ शिक्षक; कुत्रे हाकलण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती!
नाशिक महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने ‘शंभर प्लस’चा नारा दिला होता. या उद्देशाने भाजपने मोठ्या प्रमाणावर इतर पक्षांतील नेत्यांना पक्षात प्रवेश दिला आणि अनेकांना उमेदवारीचे संकेतही देण्यात आले. 122 नगरसेवक पदांसाठी तब्बल 1,077 इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात जागा मर्यादित असल्याने अनेकांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि याच टप्प्यावर नाराजीला तोंड फुटले.
दरम्यान, महायुती होणार की नाही याबाबत सुरू असलेल्या संभ्रमाचा फटका भाजपला बसला. अखेर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र युतीची घोषणा केल्यानंतर भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. भाजपकडून 118 उमेदवार जाहीर करण्यात आले, मात्र एबी फॉर्म वितरणात झालेल्या गोंधळामुळे काही उमेदवारांचे अर्ज बाद झाले. यामुळे आधीच असंतुष्ट असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये संताप अधिकच वाढला. त्यातच इतर पक्षांतून आलेल्या 33 जणांना उमेदवारी दिल्याने भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा उद्रेक झाला.
बंडखोरी इतकी तीव्र झाली की, प्रभाग क्रमांक 13 मधील भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी थेट पक्ष कार्यालयासमोर आंदोलन केले. शहराध्यक्ष सुनील केदार यांना घेराव घालून निषेध व्यक्त करण्यात आला आणि त्यांना प्रतीकात्मक स्वरूपात गाजर देण्यात आले. पक्षाकडून बंडखोरांना समजावून सांगण्याचे आणि माघार घ्यायला लावण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र सर्वांना थांबवण्यात अपयश आल्यानंतर अखेर भाजपने कठोर पाऊल उचलत हकालपट्टीची कारवाई केली.
या कारवाईबाबत भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. पच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणे, तसेच अपक्ष किंवा इतर पक्षांकडून उमेदवारी स्वीकारणे हा गंभीर पक्षशिस्तभंग असल्याचे सांगत, अशा कृतींना कोणतीही माफी दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
या हकालपट्टीच्या कारवाईत माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी सभागृह नेते शशिकांत जाधव, सतीश सोनवणे, कमलेश बोडके, माजी गटनेते दिलीप दातीर, अनिल मटाले यांच्यासह अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. नाशिकमधील भाजपच्या राजकारणात या कारवाईमुळे मोठा भूकंप झाला असून, निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घडामोडींचे पडसाद निकालावर उमटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







