Municipal election : महायुती व महाविकास आघाडीत जागावाटपाचे भिजत घोंगडे कायम

lives of aspirants hang balance; leaderships wait and watch strategy to prevent rebellion : इच्छुकांचा जीव टांगणीला; बंडखोरी टाळण्यासाठी नेतृत्वाची ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ रणनीती

Akola : अकोला महापालिका निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढवण्याकडे दोन्ही बाजूंच्या नेतृत्वाचा कल असला तरी जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असताना जागावाटपावर निर्णय न झाल्याने इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत बंडखोरी टाळण्यासाठी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका ठेवत नेतृत्वाकडून हालचाली सुरू असल्याचे चित्र आहे.

अकोला महापालिकेच्या २० प्रभागांतील ८० जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून अर्जांची मोठ्या प्रमाणावर उचल होत असली तरी प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याचा वेग मंदावलेला आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी महायुती करून निवडणूक लढवण्याची तयारी असून प्रदेशस्तरासह स्थानिक नेतेही या भूमिकेला अनुकूल आहेत. मात्र, जागावाटप हा सर्वात कळीचा मुद्दा ठरत आहे.

BMC election : तुर्तास चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच, जागावाटपाचा तिढ्याकडे लक्ष

मागील निवडणुकीत भाजपचे ४८ तर एक समर्थित असा एकूण ४९ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे महायुतीत मोठा भाऊ म्हणून भाजप ६० ते ६५ जागा लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकत्रित शिवसेनेच्या आठ जागा तर राष्ट्रवादीच्या पाच जागा होत्या. यावेळी त्यांना तेवढ्याच किंवा एक-दोन जागा वाढवून मिळण्याचा अंदाज आहे. मात्र, कोणती जागा कुणासाठी सोडायची, यावर अद्याप एकमत न झाल्याने महायुतीचे भवितव्य चर्चेत अडकले आहे. या अनिश्चिततेमुळे इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढताना दिसत आहे.

दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट एकत्रित निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून मनसेदेखील ठाकरे गटासोबत असल्याची चर्चा आहे. मुस्लीम बहुल भागांमध्ये इच्छुकांचा ओढा काँग्रेसकडे अधिक दिसून येत आहे. महाविकास आघाडीत सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार हे जवळपास निश्चित असले तरी जागावाटपाचे अंतिम चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासाठी नेत्यांच्या बैठकींचे सत्र सुरूच असून उद्यापर्यंत तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

PMC election : अर्ध्या रात्री बैठकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा फिस्कटली

दरम्यान, महायुती म्हणून एकत्रित निवडणूक लढण्याची भावना नेतृत्व आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्या दृष्टीने चर्चा सुरू असून लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती भाजपच्या वतीने दिली जात आहे. तर महाविकास आघाडीत घटक पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढण्याचा निर्णय झाल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. जागावाटपावर्चा सुरू असून त्यावर उद्यापर्यंत शिक्कामोर्तब होईल, वंचित बहुजन आघाडीसोबत कोणतीही आघाडी झालेली नसल्याचेही असेही स्पष्ट केले जात आहे.

एकंदर पाहता, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचे भिजत घोंगडे कायम असून अंतिम क्षणापर्यंत राजकीय हालचालींना वेग राहण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांचे लक्ष आता नेतृत्वाच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.

__