Municipal election : नाशिकमध्ये १५ प्रभागांत चुरशीचा रणसंग्राम; प्रमुख नेत्यांमध्ये टफ फाइट

Shinde Ajit Pawar groups challenge BJP, Thackeray group strong entry : भाजपविरोधात शिंदे-अजित पवार गटांचे आव्हान, ठाकरे गटाचीही जोरदार एंट्री

Nashik : नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता पूर्णपणे तापला असून शहरातील ३१ प्रभागांमधील १२२ जागांसाठी तब्बल ७३५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी आणि चिन्हवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रमुख लढती स्पष्ट झाल्या असून किमान १५ प्रभागांमध्ये हायव्होल्टेज आणि टफ फाइट पाहायला मिळणार आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, उद्धव ठाकरे गट, मनसे, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात नाशिकची सत्ता मिळवण्यासाठी थेट संघर्ष रंगला आहे.

या निवडणुकीत भाजपने स्वबळावर सर्वाधिक ११६ उमेदवार उभे केले असून दोन उमेदवारांना पुरस्कृत केले आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटाची युती झाली असून शिंदे गटाने १०२ तर अजित पवार गटाने ४२ उमेदवार दिले आहेत. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाचे ७९, मनसेचे ३०, काँग्रेसचे २२ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ३१ उमेदवार मैदानात आहेत. वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे ५५ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

Internal Rift in MNS : ‘मनसेला विषारी इंजेक्शन देऊन मारण्याचा डाव’; संतोष नलावडे यांचे खळबळजनक पत्र!

प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजप आणि शिंदे गटामध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे. प्रभाग १ ड मध्ये भाजपचे अरुण पवार आणि शिंदे गटाचे प्रवीण जाधव आमनेसामने आहेत. प्रभाग १ ब मध्ये भाजपच्या माजी महापौर रंजना भानसी यांच्याविरोधात शिवसेनेचे गणेश चव्हाण आणि महाविकास आघाडीचे विशाल पोरिंदे रिंगणात उतरले आहेत. क गटात भाजपमध्ये घरवापसी केलेल्या गणेश गिते यांच्या पत्नी दीपाली गिते भाजपकडून निवडणूक लढवत असून त्यांच्याविरोधात शिंदे गटाच्या उर्मिला निरगुडे आहेत.

प्रभाग ५ मध्ये माजी महापौर आणि माजी उपमहापौर यांच्यात प्रतिष्ठेची लढत होत आहे. प्रभाग ५ ड मध्ये माजी महापौर अशोक मुर्तडक हे अपक्ष म्हणून, शिंदे गटाच्या पाठिंब्याने निवडणूक लढवत असून त्यांच्यासमोर भाजपचे माजी उपमहापौर गुरमित बग्गा यांचे आव्हान आहे. प्रभाग ५ अ मध्ये खंडू बोडके आणि भाजप बंडखोर कमलेश बोडके यांच्यात चुरशीचा सामना होत आहे.

Municipal election: इम्तियाज जलील भाजपचे हस्तक असून त्यांनी शहराला व्यसन लावले

प्रभाग ७ मध्ये भाजपचे माजी नगरसेवक योगेश हिरे आणि शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते यांच्यातील लढतीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. भाजपचे तीन आमदार थेट प्रचारात उतरल्याने ही लढत अधिक तीव्र झाली आहे.
प्रभाग ९ मध्ये चुलत भावांमध्ये थेट सामना रंगणार आहे. प्रभाग ९ ड मध्ये भाजपचे अमोल पाटील आणि शिंदे गटाचे प्रेम पाटील यांच्यात थेट लढत होत असून प्रेम पाटील हे माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र आहेत. याच प्रभागातील ब गटात भाजपचे दिनकर पाटील, शिंदे गटाचे गुलाब माळी आणि उबाठा गटाच्या कावेरी कांडेकर यांच्यात तिरंगी लढत आहे.

प्रभाग २९ मध्ये बडगुजर घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली असून भाजपचे दीपक बडगुजर आणि भाजपचेच बंडखोर अपक्ष मुकेश शहाणे यांच्यात थेट सामना होत आहे. प्रभाग २५ मध्ये भाजपचे सुधाकर बडगुजर, शिंदे गटाचे ॲड. अतुल सानप आणि उद्धव ठाकरे गटाचे अतुल लांडगे यांच्यात तिरंगी लढत रंगणार असून एबी फॉर्मच्या वादामुळे हा प्रभाग आधीपासून चर्चेत आहे.

Raj Thackeray : मोदींची जादू नसती तर भाजपचा पत्त्यांचा बंगला कोसळला असता

प्रभाग १५ मध्ये उद्धव ठाकरे गटाचे महानगरप्रमुख प्रथमेश गिते आणि भाजपचे मिलिंद भालेराव यांच्यात प्रतिष्ठेची लढत होत असून गिते कुटुंबाची ताकद येथे कसोटीला लागली आहे. प्रभाग २४ मध्ये भाजपचे कैलास चुंभळे आणि शिंदे गटाचे प्रवीण तिदमे यांच्यात थेट लढत असून ड गटात भाजप, शिंदे गट आणि उबाठा यांच्यात तिहेरी संघर्ष आहे.
प्रभाग १३ मध्ये भाजपमध्ये नव्याने प्रवेश केलेले शाहू खैरे आणि शिंदे गटाचे गणेश मोरे आमनेसामने असून याच प्रभागात भाजप, उबाठा आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत होत आहे. याशिवाय प्रभाग १६ मध्ये भाजपचे कुणाल वाघ आणि शिंदे गटाचे राहुल दिवे, प्रभाग १२ मध्ये भाजपच्या नुपूर सावजी आणि अजित पवार गटाच्या डॉ. हेमलता पाटील, प्रभाग १७ मध्ये भाजपचे दिनकर आढाव आणि शिंदे गटाचे राजेश आढाव, प्रभाग २० मध्ये भाजपचे संभाजी मोरुस्कर आणि शिंदे गटाचे कैलास मुदलीयार, तर प्रभाग ३० मध्ये भाजपचे अजिंक्य साने आणि राष्ट्रवादीचे सतीश सोनवणे यांच्यात चुरशीच्या लढती होत आहेत.

एकीकडे भाजप स्वबळावर सत्ता टिकवण्याच्या तयारीत असताना शिंदे गट आणि अजित पवार गट भाजपला थेट आव्हान देत आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे गट, मनसे आणि काँग्रेसनेही जोरदार प्रचार सुरू केला असून नाशिक महापालिकेची सत्ता नेमकी कोणाच्या हाती जाणार, याबाबत शहरात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

__