Municipal election: महायुतीची घोडदौड; ९ उमेदवार बिनविरोध

After Ravindra Chavan, Shrikant Shinde’s masterstroke : रवींद्र चव्हाणांनंतर श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक

Mumbai: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजप–शिवसेना महायुतीने मतदानापूर्वीच मोठी आघाडी घेतली असून, महापालिका निवडणुकीत राजकीय घोडदौड सुरू झाल्याचे चित्र आहे. अर्ज छाननी आणि माघारीनंतर भाजपचे ५ आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ४ असे एकूण ९ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.

१२२ सदस्यसंख्या असलेल्या केडीएमसीमध्ये सत्तास्थापनासाठी ६२ जागांची आवश्यकता असून, मतदान होण्याआधीच ९ जागा महायुतीच्या खात्यात जमा झाल्या आहेत. त्यामुळे महायुती आता बहुमतापासून अवघ्या ५३ जागा दूर आहे. भाजप समर्थकांकडून याचा जल्लोष सुरू असून, ही घडामोड महायुतीसाठी मोठा राजकीय संदेश देणारी मानली जात आहे.

भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची रणनीती यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे. रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर, मंदा पाटील यांच्यानंतर प्रभाग क्रमांक २४-ब मधून ज्योती पवन पाटील या बिनविरोध निवडून आल्या. त्यामुळे केडीएमसीत भाजपच्या बिनविरोध उमेदवारांची संख्या ५ वर पोहोचली आहे.

Municipal election: असंही नाराजी नाट्य… नवऱ्याने भाजपविरुद्ध बंडखोरी केली!

दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटानेही केडीएमसीत आपला डंका वाजवला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या रणनीतीमुळे शिवसेनेचे ४ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. पॅनल क्रमांक २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे आणि वृषाली रणजित जोशी यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर प्रभाग क्रमांक २८-अ मधून हर्षल राजेश मोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. हर्षल मोरे हे आमदार राजेश मोरे यांचे चिरंजीव आहेत. संबंधित प्रभागांतील सर्व अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने हे निकाल बिनविरोध लागले असून, शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

दरम्यान, केवळ केडीएमसीपुरतेच नव्हे तर राज्यातील इतर महापालिकांमध्येही महायुतीने बिनविरोध विजय मिळवले आहेत. भाजपने धुळे महापालिकेत २ आणि पनवेल महापालिकेत १ अशी एकूण ८ जागा राज्यभरात बिनविरोध जिंकल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाने केडीएमसीतील ४ आणि जळगावातील १ अशी ५ जागा बिनविरोध मिळवल्या आहेत. तर अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची १ जागा बिनविरोध निवडून आली आहे.

Municipal Election 2026: २९ महापालिकांतील २८६९ जागांसाठी ३३ हजारांहून अधिक उमेदवार

या सर्व घडामोडींमुळे राज्यात भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी महायुतीच्या एकूण १३ जागा बिनविरोध झाल्या असून, महापालिका निवडणुकीत महायुतीची पकड अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.