Municipal election : महायुतीत जागावाटपावर हालचाली, अंतिम यादीवर शिक्कामोर्तब

Marathon discussion between Eknath Shinde and Ravindra Chavan lasted for five hours : एकनाथ शिंदे आणि रविंद्र चव्हाण यांच्यात पहाटेपर्यंत पाच तास मॅरेथॉन चर्चा

Mumbai: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आगामी महानगरपालिका निवडणुकांकडे केंद्रित झाले आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून हालचालींना वेग आला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यात तब्बल पाच तास चाललेली मॅरेथॉन बैठक महत्त्वाची ठरली आहे. ठाणे येथील एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी ही बैठक पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होती.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांमधील जागावाटपाचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपावर जवळपास अंतिम निर्णय झाल्याचे संकेत मिळत असून, अधिकृत घोषणेची केवळ प्रतीक्षा असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आज किंवा येत्या काही तासांत महायुतीकडून जागावाटपाची अंतिम यादी जाहीर होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Municipal election : ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जागावाटपावर पेच

निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. मुंबई, ठाण्यासह सर्व महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना आणि इतर मित्रपक्षांकडून दिवसरात्र बैठका आणि रणनीती आखण्याचे काम सुरू आहे.

महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी शिवसेनेच्या आमदार आणि नगरसेवकांची विशेष बैठक घेतली होती. या बैठकीत आमदारांना आपापल्या मतदारसंघावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या, तर नगरसेवकांना निवडणूक होईपर्यंत आपले वॉर्ड न सोडण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. शिवसेना-भाजप यांच्यातील जागावाटप अंतिम टप्प्यात असून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत युती आणि जागावाटपाची औपचारिक घोषणा होईल, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, सोमवारीच उद्योग मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांना तातडीने रत्नागिरीहून मुंबईला बोलावण्यात आले होते. मुंबईत दाखल होताच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमुळे महायुतीतील अंतर्गत चर्चा अधिक तीव्र झाल्याचे चित्र दिसून आले आहे.

दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या घडामोडींमुळे महायुतीतील जागावाटपाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काही तासांत महायुतीकडून अधिकृत घोषणा होत असल्यास, महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.

Sudhir Mungantiwar : पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २० हजार बोनस द्या

महानगरपालिका निवडणूक कार्यक्रमानुसार 23 ते 30 डिसेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होणार असून 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना माघार घेता येणार आहे. 3 जानेवारीला अंतिम उमेदवार यादी आणि निवडणूक चिन्ह जाहीर होणार असून 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहेत.