Municipal elections : बावनकुळे यांच्या समोरच ‘एबी फार्म चोर’, ‘२०० युनिट चोर’च्या घोषणां

Candidate change controversy explodes in Chandrapur campaign meeting shaken : उमेदवारी बदलाच्या वादाचा चंद्रपुरात स्फोट, प्रचार सभा हादरली

Chandrapur : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील असंतोष ऐन प्रचारात रस्त्यावर उतरल्याचे चित्र चंद्रपुरात पाहायला मिळाले. भाजपचे महापालिका निवडणूक प्रभारी तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाषण सुरू असतानाच त्यांच्या समोरच ‘एबी फार्म चोर’, ‘२०० युनिट चोर’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. उमेदवारी यादीत झालेल्या बदलावरून नाराज झालेल्या कार्यकर्त्यांचा रोष थेट प्रचार सभेत व्यक्त झाल्याने भाजपसाठी ही बाब चांगलीच अडचणीची ठरली आहे.

चंद्रपूर शहरात महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून अंतिम यादी ठरवून ती प्रदेश भाजपाकडे पाठवली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी अधिकृत यादी जाहीर केली. मात्र निवडणूक प्रमुख असलेल्या आमदार किशोर जोरगेवार यांनी अचानक त्या यादीतील तब्बल १७ उमेदवार बदलत आपल्या मर्जीतल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे. या प्रकारामुळे पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून ‘एबी फार्म चोरी’चा शिक्का जोरगेवार यांच्यावर बसल्याची चर्चा चंद्रपूरसह राज्यभरात झाली.

Municipal elections : बावनकुळे मंचावर असतानाच भाजपाच्या अन्यायग्रस्तांचा आक्रोश उफाळला !

याच वादाचे पडसाद महसूल मंत्री बावनकुळे यांच्या प्रचार सभेत उमटले. जाहीर सभा सुरू असतानाच भाजपच्या बंडखोर उमेदवाराने थेट मंचावर येत बावनकुळे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदार किशोर जोरगेवार यांनी हस्तक्षेप करत बंडखोराला मंचावरून खाली उतरवले. एका बाजूला मंचावर गोंधळ, तर दुसऱ्या बाजूला दुसऱ्या ठिकाणी झालेल्या सभेत सभास्थळी आणि सभेबाहेर नाराज कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरू होते.

सायंकाळी इंदिरानगर येथे झालेल्या सभेतही परिस्थिती तणावपूर्णच राहिली. बावनकुळे यांचे भाषण सुरू असतानाच ‘एबी फार्म चोर आहे’, ‘२०० युनिट चोर आहे’ अशा घोषणा दिल्या गेल्या. या घोषणांमुळे सभास्थळी तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही दूरवर उभ्या असलेल्या नाराज कार्यकर्त्यांनी आमदार किशोर जोरगेवारांवर थेट आरोप करत जोरजोरात घोषणा दिल्या. या घोषणाबाजीमुळे बावनकुळे यांना सभास्थळी येताना आणि तिथून परत जाताना निदर्शने टाळण्यासाठी वाहनाचा मार्ग बदलावा लागल्याची माहिती आहे.

Municipal elections: राजकारण तापले, इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला!

 

या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे आपल्या भाषणात स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर भर देताना दिसले. १५ तारखेनंतर रामाळा तलावाचे पुनरुज्जीवन करण्यात येईल, यामुळे भोई समाजाला मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल, तसेच भूमिगत गटार योजना आणि इतर महत्त्वाचे निर्णय महानगरपालिकेमार्फत घेतले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र विकासाच्या घोषणांपेक्षा उमेदवारी बदलाचा वाद आणि घोषणाबाजीच अधिक चर्चेत राहिली.

एकाच दिवशी एका सभेत बंडखोर उमेदवाराने थेट मंचावर घुसून भाषणात व्यत्यय आणणे आणि दुसऱ्या सभेत महसूल मंत्र्यांच्या समोरच जोरदार घोषणाबाजी होणे, यामुळे चंद्रपूर भाजपमधील अंतर्गत फूट उघड झाली आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून मनमानी पद्धतीने उमेदवारी वाटप केल्याचा रोष आता प्रचारात उफाळून येत असून, महापालिका निवडणुकीत भाजपसाठी ही स्थिती धोक्याची घंटा मानली जात आहे. प्रदेश पातळीवरील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसाठी चंद्रपूरची ही परिस्थिती गंभीर चिंतेची बाब ठरत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

___