Criticism asking How 1500 rupees cover rising inflation : ‘1500 रुपयांत वाढती महागाई कशी भागणार?’ असा सवाल करत टीका
Nashik : राज्य सरकार महिलांना आर्थिक मदतीच्या नावाखाली मतांसाठी भुलवत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या मर्यादांवर एका वाक्यात बोट ठेवले. नाशिक येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना त्यांनी वाढती महागाई आणि सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. महिलांना दरमहा दिले जाणारे 1500 रुपये सध्याच्या परिस्थितीत अपुरे असून ते केवळ 15 दिवसांतच संपतात, असे म्हणत राज ठाकरे यांनी सरकारच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
राज ठाकरे म्हणाले की, घरगुती गॅस सिलेंडरची किंमत जवळपास 1000 रुपयांवर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत 1500 रुपयांत संपूर्ण महिन्याचा खर्च कसा भागणार, याचा विचार सरकारने करायला हवा. जातीधर्माच्या नावाखाली लोकांना फसवून आणि तात्पुरत्या आर्थिक आमिषांनी मते मिळवण्याचे राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा योजनांमुळे तुमच्या भावी पिढ्यांचे आयुष्य धोक्यात येईल, त्यामुळे आज घेतलेले निर्णय उद्याच्या पिढ्यांना त्रासदायक ठरू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.
Economic Boost : निवडणुकीतून पालिकेची तिजोरी भरली; बुलढाणा नगरपरिषदेला ५५ लाखांची करवसुली
सभेत बोलताना राज ठाकरे यांनी मतदारांना थेट साद घातली. पुढच्या पिढ्या एक दिवस असा प्रश्न विचारतील की आमच्या शहराचा विकास का झाला नाही, आमच्या भवितव्याचा विचार कोणी केला नाही. आमचा बाप विकला गेला, आईने पैसे घेतले, त्यामुळे आमचं भविष्य घडू शकलं नाही, असे जर मुलांना म्हणावे लागू नये असेल तर मनसे आणि शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
राज ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार वर्षे पुढे ढकलल्याबाबतही सत्ताधाऱ्यांना सवाल केला. 1952 साली स्थापन झालेल्या पक्षाला 2026 मध्येही दुसऱ्याची पोरे दत्तक घ्यावी लागत आहेत, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टोला लगावला. नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही त्यांनी टीका केली. पूर्वीचा लाकूडतोड्या प्रामाणिक होता, पण आज झाडं छाटण्याआधी पक्षातील लोकं आणि कार्यकर्ते छाटले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला.
Political Battle : मलकापूर नगरपरिषदेत स्वीकृत सदस्यपदासाठी काँटे की टक्कर
निवडणुकीच्या काळात नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा करणारे नेते नंतर फिरकलेच नाहीत, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेण्याचे जाहीर केले होते, मात्र नंतर ते नाशिककडे फिरकले नाहीत, असे सांगत नाशिककरांनी विकासकामे विसरून दिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आक्रमक शैलीतील या भाषणातून राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेसह महायुती सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला.








