Gujarat BJP leader sensational statement, angry reaction in Maharashtra : गुजरातच्या भाजप नेत्याचं खळबळजनक विधान, महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया
Mumbai : राज्यात २९ महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच भारतीय जनता पार्टीच्या एका वरिष्ठ नेत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते, असे खळबळजनक विधान केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते सी. आर. पाटील यांनी केल्याने महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या विधानामुळे शिवप्रेमी जनतेची नाराजी वाढली असून विरोधकांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
गुजरातमधील सूरत येथे आयोजित पाटीदार समाजाच्या कार्यक्रमात बोलताना सी. आर. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते, असे वक्तव्य केले. “छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते, याचा मला आनंद आहे. त्यांनी हिंदवी स्वराज्याची यशस्वी स्थापना केली,” असे विधान पाटील यांनी केल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे.
हे विधान अशा काळात समोर आले आहे, जेव्हा महाराष्ट्रात महापालिका निवडणुका सुरू आहेत. विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मराठी विरुद्ध अमराठी असा वाद रंगलेला असताना आणि उद्योग गुजरातला नेल्याचे आरोप सत्ताधाऱ्यांवर होत असताना, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत असे विधान करून भाजपने जाणूनबुजून वाद निर्माण केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “मी सी. आर. पाटील यांचे भाषण ऐकले. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना गुजराती दाखवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि मराठा साम्राज्याचे राजे आहेत. हा महाराष्ट्राचा आणि मराठी समाजाचा फार मोठा अपमान आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
Municipal elections : उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार
पुढे बोलताना राऊत म्हणाले, “भारतीय जनता पार्टीने यापूर्वीही अनेक युगपुरुष पळवण्याचा प्रयत्न केला. नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, रवींद्रनाथ टागोर यांना आपल्या राजकारणासाठी वापरण्याचा प्रयत्न झाला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आता शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांना गुजरातला पळवण्याचा प्रयत्न सुरू आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
Municipal elections : प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र?
सी. आर. पाटील हे गुजरातमधील भाजपचे अत्यंत प्रभावी नेते मानले जातात. त्यांचे पूर्ण नाव चंद्रकांत रघुनाथ पाटील असून ते सध्या केंद्र सरकारमध्ये जलशक्ती मंत्री आहेत. त्यांनी गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्षपदही भूषवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ते अत्यंत विश्वासू मानले जातात. जरी त्यांचे मूळ जळगाव, महाराष्ट्र येथे असले तरी त्यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द गुजरातमध्ये घडली आहे.
सी. आर. पाटील यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात भाजपविरोधात संतापाची लाट उसळण्याची शक्यता असून महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
_








