nagarparishad nagarsevak election postponed 22 mayor 731 corporators : काय आहे नवीन कार्यक्रम? उमेदवारांमध्ये संताप, फडणवीसांचा पण आक्षेप
Mumbai : राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका आणि तब्बल 700 हून अधिक नगरसेवक जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आली असून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणी गेले दोन आठवडे प्रचाराचा धुरळा उडत होता, प्रचारयुद्ध चांगलेच तापले होते, तिथे अचानक निवडणूक लांबणीवर गेल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहावर अक्षरशः पाणी फेरले गेले आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले असले तरी विरोधकांसह उमेदवारांचा रोष चव्हाट्यावर आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रा नुसार प्रभावित नगरपरिषदांसाठी नवा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यानुसार 4 डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक कार्यक्रम पुन्हा जारी केला जाणार आहे. 10 डिसेंबर हा नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिवस ठरवण्यात आला असून अंतिम उमेदवार यादी 11 डिसेंबर रोजी जाहीर केली जाईल. नव्या कार्यक्रमानुसार मतदान 20 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत होणार असून 21 डिसेंबरपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 23 डिसेंबरपूर्वी निकाल राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे.
Raid on office : “ही कार्यकर्त्यांची निवडणूक, आरोप-प्रत्यारोप आमचे नाही”
राज्यात एकूण 288 नगराध्यक्षपदांपैकी 253 ठिकाणी उद्या नियोजित वेळेनुसार मतदान होणार आहे. तर 3 नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 22 नगराध्यक्षपदांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. विभागवार पाहता अमरावती विभागात बाळापूर, अंजनगाव सुर्जी, यवतमाळ, देऊळगाव राजा, वाशिम या ठिकाणच्या निवडणुका स्थगित झाल्या आहेत. कोकण विभागात अंबरनाथ, छत्रपती संभाजीनगर विभागात फुलंब्री, धर्माबाद, मुखेड, रेणापूर, वसमत, नागपूर विभागात घुग्घूस आणि देवळी, नाशिक विभागात देवळाली प्रवरा, कोपरगाव, पाथर्डी, नेवासा, तर पुणे विभागातील बारामती, फुरसुंगी – उरळी देवाची, महाबळेश्वर, फलटण, मंगळवेढा आणि अणगर येथील निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत.
Raid on office : शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का; शहाजी बापूंच्या कार्यालयावर धाड
नगरसेवक पदांबाबत पाहता 731 जागांवर निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली आहे. अमरावतीमध्ये 187, छत्रपती संभाजीनगरमध्ये 144, पुण्यात 143, नाशिकमध्ये 120, कोकणात 69 आणि नागपूर विभागात 68 नगरसेवक जागांवर स्थगिती लागू झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी राजकीय गणिते, समतोल, आघाड्या आणि प्रचार रणनीती पुन्हा आखावी लागणार आहे.
या निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र आक्षेप घेत निवडणूक आयोगावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला असून उद्या मतदान आणि आज निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे फडणवीस म्हणाले. उमेदवारांनी केलेली प्रचार मेहनत, खर्च आणि मनुष्यबळ वाया गेले असून आयोग स्वायत्त असला तरी अशा प्रकारे निर्णय घेणे अत्यंत चुकीचे आहे. याविरोधात रिप्रेझेंटेशन देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Maharashtra politics : राज ठाकरे सोबत आल्यास भाजपा पराभूत होईल
निवडणूक लांबणीवर गेल्याने राजकीय वातावरण तापले असून विविध पक्षांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. घोषणाबाजी, प्रचार इव्हेंट, मतदार संपर्क, घराघर भेटी सर्व काही अचानक थांबले असल्याने उमेदवारांच्या मनात अस्वस्थता आणि अनिश्चितता वाढल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. आगामी 20 आणि 21 डिसेंबर राज्यातील 22 नगरपरिषदांसाठी निर्णायक ठरणार असून या निवडणुकीत मतदारांचा कल, राजकीय समीकरणे आणि स्थानिक नेतृत्वांची ताकद पुन्हा कसोटीला लागणार आहे.
___








