Municipal elections : निवडणुकीत महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश–बिहार झाला

Raj Thackeray scathing criticism of the ruling party : राज ठाकरे यांची सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका

Mumbai: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि सत्ताधारी महायुतीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. पश्चिम बंगालमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बिनविरोध निवडींविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या भाजपाने महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये सुरू असलेल्या बिनविरोध निवडींबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी थेट मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

शिवसेना ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या युतीच्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या वचननाम्याचे प्रकाशन शिवसेना भवनात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडले. याच कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलो आहोत, अशा आविर्भावात भाजप निवडणुका हाताळत असून त्यांनी महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश–बिहार केला आहे, असा आरोप त्यांनी केला.

Municipal election : मतचोरी, ईव्हीएम घोटाळा आणि प्रशासकीय भ्रष्टाचारावर गंभीर आरोप

काँग्रेसने त्यांच्या काळात जे केले, त्याच कारणावरून आम्हीही तेच करतो, असे सांगणाऱ्यांना राज ठाकरे यांनी इशारा दिला. सत्ता कधीच कायमची नसते. उद्या दुसरे कोणी सत्तेवर आले आणि त्यांनी तुमच्या दामदुप्पट हेच प्रकार सुरू केले, तेव्हा मात्र तक्रार कराल, असा टोला त्यांनी लगावला. आपण कधीच सत्तेबाहेर जाणार नाही हा भाजपचा भ्रम असून तो महापालिका निवडणुकांतून दूर झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.

पालिका निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडीसारखे नवे आणि चुकीचे पायंडे पाडले जात आहेत, याचे भान सत्ताधाऱ्यांनी ठेवावे, असे सांगत राज ठाकरे यांनी सुसंस्कृत महाराष्ट्रात निवडणुकांच्या बाबतीत उत्तर प्रदेश आणि बिहारसारखी परिस्थिती निर्माण केली जात असल्याची टीका केली. आजवर देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राचे आणि येणाऱ्या पिढ्यांचे वाटोळे करणे, तसेच राजकारणात येऊ इच्छिणाऱ्यांची विचारसरणीच बदलणे हे राज्याच्या भवितव्यासाठी घातक असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

तब्बल वीस वर्षांनंतर शिवसेना भवनात परतल्याची भावना व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले की, इतक्या वर्षांनंतर इथे येताना जेलमधून सुटून आल्यासारखे वाटते. खूप वर्षांनी सेना भवनात आलो असून जुन्या आठवणी अतिशय रोमांचकारी आणि आनंददायी आहेत. अनेक आठवणी मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

Uddhav Balasaheb Thackeray : काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून ठाकरे गटात, निवडणूक होताच शिंदे गटात

महापौर पदावरून हिंदू–मराठी असा शब्दखेळ करणाऱ्या भाजपवर टीका करताना राज ठाकरे यांनी इतिहासाचा दाखला दिला. पेशव्यांच्या काळात गायकवाड, शिंदे आणि होळकर ही तीन संस्थाने उभी राहिली होती. गायकवाड हे बडोद्याचे महाराज होते आणि बडोद्यात मराठेशाहीचे साम्राज्य होते. मग गुजरातमध्ये सगळे महापौर गुजराती कसे, असा सवाल उपस्थित करत हा महाराष्ट्र आहे आणि इथल्या प्रत्येक शहराचा महापौर मराठीच होणार, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

इथे हिंदू आणि मराठी असा भेद करण्याचे कारण नाही. आम्ही हिंदू आहोत, पण हिंदी नाही, असे स्पष्ट करत महाराष्ट्रातील शहरांमध्ये मराठीचा मान राखलाच पाहिजे, असे राज ठाकरे यांनी ठणकावले. त्यामुळे जो महापौर होईल, तो मराठीच असेल, असा स्पष्ट संदेश त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.