Sanjay Raut attack on unopposed elections : बिनविरोध निवडणुकांवरून संजय राऊतांचा घणाघात
Mumbai : राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले असून २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. मात्र, त्याआधीच बिनविरोध निवडणुकांवरून राजकीय वातावरण तापले आहे. अनेक ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याने विरोधकांनी सत्ताधारी महायुती आणि राज्य निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी अत्यंत जहरी शब्दांत टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, बिनविरोध निवडणुका सरळ मार्गाने झालेल्या नाहीत, हे निवडणूक आयोगालाही स्पष्टपणे दिसत आहे. तरीसुद्धा निवडणूक आयोगाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना क्लीनचीट दिली जात आहे. बिनविरोध निवडणुका या धमकी, पैशांचे आमिष आणि यंत्रणांच्या गैरवापरातून झाल्या आहेत, असा थेट आरोप त्यांनी केला.
पालिकेने ज्या अधिकाऱ्यावर ठपका ठेवला होता, त्यालाही निवडणूक आयोगाने क्लीनचीट दिली. अनेक ठिकाणी पैसे देऊन लोकांकडून टोकण घेतले गेले आणि त्यानंतर उमेदवारांना अर्जच भरू दिले गेले नाहीत. आपचे, जनता दलाचे तसेच शिवसेना आणि मनसेचे उमेदवार रांगेत उभे असतानाही त्यांचे अर्ज स्वीकारले गेले नाहीत, असा दावा राऊत यांनी केला. मनसेचे उमेदवार बबन महाडिक यांना विधानसभा अध्यक्षांच्या दहशतीमुळे उमेदवारी अर्ज दाखल करू दिला नाही, असेही त्यांनी सांगितले.
निवडणूक आयोगावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या डोळ्यांच्या खाचा झाल्या आहेत का? की त्यांच्या डोळ्यांत गारगोट्या आहेत? जर हे सर्व त्यांना दिसत नसेल, तर निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा एजंट म्हणून काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, या निवडणूक आयोगाच्या काळात महाराष्ट्रात तब्बल ७० ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या. याआधी कधी एवढ्या मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवडणुका झाल्या होत्या का, हे दाखवून द्या.
महाराष्ट्राने अनेक मोठे नेते पाहिले, मनोहर जोशींसारखे नगरसेवकही झाले, पण कधी बिनविरोध निवडणूक होऊ दिली नाही. आज मात्र भाजप आणि शिंदे गटाचे छपरी, टपरी गुंड बिनविरोध निवडून आणले जात आहेत आणि निवडणूक आयोग त्यांना क्लीनचीट देत आहे, असा घणाघात त्यांनी केला.
unopposed seats : ‘बिनविरोध’ ही संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नाही
निवडणूक आयोगाचा हा ‘क्लीनचीटचा कारखाना’ राज्यासाठी आणि देशासाठी धोकादायक असल्याचे सांगत, प्रत्येक ठिकाणी नियमबाह्य काम झाले असून कायद्याचे उल्लंघन करण्यात आले आहे, असा आरोपही राऊत यांनी केला. सत्ताधारी पक्षाला मदत होईल अशाच पद्धतीने काम सुरू असून निवडणूक आयोगाला याचा हिशोब द्यावा लागेल. प्रत्येक गोष्टीला अंत असतो, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.








