Sanjay Raut made a big revelation about the Uddhav-Raj Thackeray alliance : उद्धव-राज ठाकरे युतीचा मोठा खुलासा संजय राऊतांनी केला
Mumbai: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली असून शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ज्या ऐतिहासिक क्षणाची प्रतीक्षा होती, तो क्षण आता जवळ आला असून दोन भावांचे मनोमिलन झाले आहे आणि युतीची औपचारिक घोषणा लवकरच होणार असल्याचे संकेत राऊत यांनी दिले.
संजय राऊत यांनी सांगितले की, २३ डिसेंबरपूर्वीच या युतीची अधिकृत घोषणा केली जाईल. महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्याआधीच ठाकरे गट आणि मनसे यांची युती जाहीर करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला जाणार आहे.
मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि कल्याण-डोंबिवलीसारख्या महत्त्वाच्या महापालिकांमधील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून आज-उद्या सर्व बाबींवर शिक्कामोर्तब होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Hindu Rashtra : भारत हे हिंदू राष्ट्रच असून त्यासाठी संविधानाच्या मान्यतेची गरज नाही
नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांवर टीका करताना संजय राऊत यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. काही नाटकांची तिकिटे मालक स्वतः विकत घेऊन ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड लावतात, कालचा निकालही तसाच असल्याची उपमा देत त्यांनी महायुतीवर प्रचंड पैसा खर्च केल्याचा आरोप केला. हा शो प्रत्यक्षात हाऊसफुल्ल नव्हता, तर कोट्यवधी रुपये खर्च करून तो तसा दाखवण्यात आला, असे ते म्हणाले.
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे हे कोणतेही राजकीय नाटक नसून तो ‘प्रितीसंगम’ असल्याचे सांगत राऊत यांनी या युतीला महाराष्ट्राच्या जनतेचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. ही युती केवळ मुंबईपुरती मर्यादित नसून नाशिक, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि पुण्यासारख्या प्रमुख शहरांमध्येही ठाकरे ब्रँडची ताकद दिसून येईल, असे त्यांनी नमूद केले.
Municipal election result : विक्रमी विजय कोणाचा, तर अवघ्या एका मतामुळे कोण ठरलं ‘कमनशीबी’
महायुतीवर पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचा आरोप करताना संजय राऊत म्हणाले की, भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांनी या निवडणुकांत कोट्यवधी रुपयांचा वापर केला. हा पैसा कुठून आला, असा सवाल उपस्थित करत त्यांनी हा पैसा जनतेचाच असल्याचा आरोप केला. आम्ही पैशाच्या ताकदीवर नाही, तर जनतेच्या विश्वासावर आणि ठाकरे नावाच्या बळावर निवडणूक लढवणार आहोत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीमुळे आगामी महापालिका निवडणुकांत महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहणार असून, राज्याच्या राजकारणात या घडामोडीकडे अत्यंत महत्त्वपूर्ण वळण म्हणून पाहिले जात आहे.
__








