Sushma Andhare criticizes the chaos in municipal elections : मनपा निवडणुकांतील घोळावर सुषमा अंधारे यांची टीका
mumbai: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणाची अक्षरशः हास्यजत्रा सुरू असल्याची टीका शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. उमेदवारी अर्ज, एबी फॉर्म, बंडखोरी आणि नाराजीच्या घटनांवर भाष्य करत त्यांनी थेट भाजप फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा केला आहे.
मनपा निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारांना उमेदवारी अर्ज देताना जे प्रकार घडत आहेत, ते पाहता राजकारण अत्यंत रंजक आणि हास्यास्पद वळणावर गेले असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या. कुणी आत्मदहनाचा प्रयत्न करत आहे, कुणी उपोषणाला बसले आहे, तर कुणी एबी फॉर्मच खाऊन टाकत आहे. काही ठिकाणी भाजपच्या नेत्यांनाच कानशिलात लगावल्याच्या घटनाही घडत आहेत. हे सगळे पाहिल्यानंतर एकच चित्र स्पष्ट होते, ते म्हणजे भाजपा फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
Pmc election: सोशल मीडिया ट्रोलिंगनंतर भाजपाच्या उमेदवार पूजा मोरे यांची माघार
भाजपाच्या संभाव्य फुटीची लक्षणे स्पष्ट करताना सुषमा अंधारे यांनी नाशिकमधील देवयानी फरांदे तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचे उदाहरण दिले. ठिकठिकाणी निष्ठावंतांना डावलले जात असून जुने विरुद्ध नवे असा संघर्ष उभा राहिला आहे. यावरून भाजपात सर्वकाही आलबेल नाही, हे स्पष्टपणे दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजपावर टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, भाजपाची भूक इतकी मोठी झाली आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणावर लोकांना पक्षात घेतले. मात्र आता घरात जागा करण्यासाठी ज्यांनी भाजपाचे घर बांधले, त्यांनाच घराबाहेर काढण्याची वेळ आली आहे. उमेदवारी देताना अनेक निष्ठावंतांचा बळी दिला गेला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
याचवेळी त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची तुलना भाजपाशी केली. आमच्या पक्षावर अशी वेळ आली नाही. पुण्यात आम्ही ८० ते ८५ जागांवर लढत आहोत. जिथे एकापेक्षा अधिक इच्छुक उमेदवार होते, तिथे त्यांना मातोश्रीवर बोलावून समजूत काढली आणि तोडगा काढण्यात आला, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट दिल्याच्या मुद्द्यावर बोलताना सुषमा अंधारे यांनी जोरदार टोला लगावला. ‘ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला’, अशी म्हण येथे लागू पडते, असे त्या म्हणाल्या. ज्या भाजपबरोबर अजित पवारांनी घरोबा केला आहे, त्या भाजपात गुन्हेगार, तडीपार, भ्रष्टाचारी आणि गुंड मोठ्या प्रमाणावर आले आहेत. भाजप सोबत असेल तर गुन्हेगारांनाही निवडून आणता येते, अशी खात्री मिळाल्यामुळेच अजित पवारांनीही अशा उमेदवारांना तिकीट दिले असल्याचा आरोप त्यांनी केला.
लोकांच्या मताचा आणि लोकशाहीचा आदर न करता राजकारणाचे गुन्हेगारीकरण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, तो अत्यंत निषेधार्ह असल्याची टीकाही सुषमा अंधारे यांनी यावेळी केली. महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्याचे चित्र दिसत आहे.








