Municipal elections : तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल !

Tanaji Sawant venomous attack on BJP over drugs case : ड्रग्ज प्रकरणावरून तानाजी सावंत यांचा भाजपवर जहरी हल्लाबोल

Dharashiv: धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून शिंदे गटाचे आमदार माजी मंत्री तानाजी सावंत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपच्या तिकिटावर नगराध्यक्ष बनवले जात असेल, तर उद्या तुळजाभवानी देवीच्या भक्तांना प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल, असा उपरोधिक आणि बोचरा टोला त्यांनी लगावला. तुळजाभवानी मंदिरातील गाभारा तोडफोड प्रकरणी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना जबाबदार धरत तानाजी सावंत यांनी त्यांच्यावर घणाघाती शब्दांत हल्ला चढवला.

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणे हे जामिनावर सुटल्यानंतर भाजपच्या तिकिटावर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. याच मुद्द्यावरून तानाजी सावंत यांनी भाजपच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला. ड्रग्जसारख्या गंभीर गुन्ह्यात अडकलेल्या व्यक्तीला सत्तेची जबाबदारी देणे म्हणजे समाजाला कोणता संदेश देत आहात, असा थेट प्रश्न त्यांनी भाजपला विचारला.

Ajit Pawar : सरकार चांगले काम करतेय, पण पुण्याचे कारभाऱ्यांनी वाट लावली

तुळजाभवानी देवीचा गाभारा हे शक्तीपीठ असून त्याचे पावित्र्य जपले पाहिजे, असे सांगत सावंत यांनी राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधला. झक मारायची असेल तर बाहेर हात लावा, गाभाऱ्याचं पावित्र्य कशासाठी भंग करता, असा सवाल करत त्यांनी मंदिरातील तोडफोड प्रकरणावरून भाजप आमदारांवर सडकून टीका केली.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना तानाजी सावंत यांनी तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि तुळजाभवानी मंदिर तोडफोड प्रकरण या दोन्ही मुद्द्यांवर भाजपला लक्ष्य केले. सत्तेच्या लालसेपोटी पवित्र मंदिरालाही वादात ओढले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

Nitesh Rane : ठाकरेंची सत्ता आल्यास मराठी शाळा बंद होऊन ऊर्दू शाळा सुरु होतील

धाराशिव नगरपरिषदेत झालेल्या पराभवाचा वचपा काढणार असल्याचा इशाराही तानाजी सावंत यांनी मित्रपक्षाला दिला. भूम-परंडा मतदारसंघात आणलेला निधी एकत्र करून पाहा. मी आणलेल्या निधीपेक्षा इतरांचा निधी जास्त असेल तर मी राजीनामा देतो, असे खुले आव्हान त्यांनी दिले.

काम करूनही दीड हजार मतांनीच निवडून येतो, ही माझ्यासाठी शोकांतिका असल्याची खंत तानाजी सावंत यांनी व्यक्त केली. गद्दारी करणाऱ्यांना ठेचून काढू, अशा शब्दांत त्यांनी पक्षाविरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तंबी दिली. दिवसा पक्षाचं नाव घ्यायचं आणि रात्री फितुरी करायची, अशा लोकांना आम्ही मानत नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगत सावंत यांनी अंतर्गत विरोधकांनाही इशारा दिला.

__