Urdu Schools Will Start If Thackeray Comes to Power, Minister Provokes : नितेश रांणेंनी डिवचले, मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार असल्याचा दावा
Mumbai मंत्री नितेश राणे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, मुंबईचा महापौर हा हिंदूच होणार आणि महायुतीचाच होणार. तसेच त्यांनी ठाकरेंवर गंभीर आरोपही केले आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. कारण ही निवडणूक केवळ मुंबईपुरती मर्यादित नसून राज्यातील राजकीय घडामोडींवरही परिणाम करणारी ठरते. भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी म्हटले की, “मुंबईचा महापौर हा हिंदूच होणार, मराठीच होणार आणि महायुतीचाच होणार. आम्ही हिंदू आहोत, उर्दू नाही.”
राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र टीका केली. त्यांनी असा आरोप केला की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नवाब मलिक यांच्या पत्रावरून मुंबईत उर्दू भवन उभारण्याचे काम सुरू झाले. त्यामुळे मुंबईत मराठी शाळांची संख्या कमी झाली आणि उर्दू शाळा वाढल्या. त्यांनी इशारा दिला की, जर ठाकरेंची सत्ता पुन्हा आली तर मराठी शाळा बंद होतील आणि उर्दू शाळा सुरू होतील. त्यामुळे त्यांनी स्पष्ट केले की, मुंबईत हिंदूच चालणार आणि मराठीत बोलणार.
मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून निवडणुकीत आपली भूमिका ठळक करण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे केला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही केवळ विकासाच्या मुद्द्यांवर मर्यादित न राहता ओळख, भाषा आणि धर्म यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर केंद्रित होत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महापौरपद कोणाच्या हाती जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईमध्ये युती विरुद्ध ठाकरे असा सामना रंगला असून पुण्यात अजित पवार विरुद्ध भाजप असा खेळ रंगतोय. ही निवडणूक एक वेगळंच वळण येतेय आणि यातील प्रचार व आरोप अत्यंत टोकाचे केले जात आहेत. आता पाहायचे आहे की जनता कोणाच्या बाजूने कल देणार आहे.








