Will two staunch opponents come together in Amravati : अमरावतीत दोन कट्टर विरोधक एकत्र येणार?
Amravati : अमरावती महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता अनपेक्षित राजकीय समीकरणं समोर येऊ लागली आहेत. भाजप आणि युवा स्वाभिमानी पक्ष यांच्यातील संघर्ष तीव्र होत असतानाच प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचं उघडपणे कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. कट्टर विरोधक असतानाही वेळ आली तर रवी राणांचा शाल देऊन सत्कार करेन, असं वक्तव्य बच्चू कडूंनी केल्याने अमरावतीच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
अमरावती महापालिका निवडणुकीत भाजप आणि रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षात थेट जुंपली आहे. रवी राणा यांनी तब्बल ३२ जागांवर उमेदवार उभे करत भाजपची डोकेदुखी वाढवली आहे. भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्या विरोधात माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा उघडपणे मैदानात उतरल्याने हा संघर्ष किती टोकाला गेला आहे, हे स्पष्ट झाले आहे.
Municipal elections : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील
या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी केलेलं वक्तव्य विशेष लक्षवेधी ठरत आहे. त्यांनी नवनीत राणा यांच्या भूमिकेचं उघडपणे कौतुक केलं. विधानसभा निवडणुकीत पती रवी राणा यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार उभा राहिल्यानंतर पत्नी म्हणून नवनीत राणा यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची असल्याचं बच्चू कडू म्हणाले. नवनीत राणा भाजपमध्ये असल्या तरी पतीसाठी त्या भाजपच्या विरोधात उभ्या राहिल्या, हे त्यांनी ‘पत्नीधर्म’ निभावल्याचं उदाहरण असल्याचं सांगितलं.
“माझ्या पतीच्या विरोधात तुम्ही लढाल, तर हिंदू शेरनी भाजपच्या विरोधातही लढायला तयार आहे, हे नवनीत राणांनी दाखवून दिलं आहे. मला नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांचं मनापासून कौतुक वाटतं,” असे म्हणत बच्चू कडूंनी भाजपवर टोला लगावला. भाजप आमच्या खिशात आहे, हे रवी राणांनी सिद्ध केलं असल्याचा दावा करत त्यांनी भाजपच्या ताकदीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
भाजपसाठी नुकसान महत्त्वाचं नाही, त्यांना नवनीत राणा महत्त्वाच्या आहेत. भाजपला माहिती आहे की, रवी राणा शिवाय अमरावतीत काम होत नाही. केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही रवी राणा शिवाय भाजपची ‘डाळ शिजत नाही’, असा आरोप बच्चू कडूंनी केला. अचलपूरमध्ये भाजपचे चार नगरसेवक पडले, ही रवी राणांची ताकद असल्याचं सांगत त्यांनी वेळ आल्यास रवी राणांचा शाल देऊन सत्कार करणार असल्याचाही मनोदय व्यक्त केला.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमरावतीतील रोड शोवरही बच्चू कडूंनी टीका केली. “तो रोड शो नव्हता, फक्त शो होता. पोलीस आणि आमदार दिसत होते, पण माणसं नव्हती. असा भंगार शो कुठेच झाला नसेल,” असा घणाघात त्यांनी केला. नवनीत राणा यांना भाजपच्या स्थानिक नेत्यांना धडा शिकवायचा असल्याचाही दावा त्यांनी केला.
Municipal elections: भाजपा आणि शिंदेंचे छपरी लोक बिनविरोध निवडून येत आहेत !
या सगळ्या घडामोडींवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनीही अप्रत्यक्षपणे नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे. नाव न घेता बोलताना ठाकूर म्हणाल्या, “न शिकलेली बाई राहुल गांधींना संविधान काय आहे हे विचारते, पण तिने अजून हनुमान चालीसा म्हणून दाखवलेली नाही.” राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने निवडणूक जिंकून नंतर हिंदू शेरनी म्हणून पुढे येण्यावरही यशोमती ठाकूर यांनी टोला लगावला.
अमरावती महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडत असलेल्या या घडामोडींमुळे राजकीय समीकरणं अधिकच गुंतागुंतीची होत असून, आगामी दिवसांत आणखी कोणते अनपेक्षित युती-टकरारी समोर येतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.








