Expressed position before corporators developments at Matoshree created stir : नगरसेवकांसमोर व्यक्त केली भूमिका; मातोश्रीवर घडलेल्या घडामोडींनी खळबळ
Mumbai: कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या अनपेक्षित ट्विस्टमुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे नाराज असल्याची माहिती समोर आली असून, याच पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीतील ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी काल मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांशी सविस्तर संवाद साधत मनसेच्या निर्णयावर आपली नाराजी स्पष्ट शब्दांत व्यक्त केली. मनसेच्या स्थानिक नेत्यांनी असा निर्णय घ्यायला नको होता, असं सांगत उद्धव ठाकरे म्हणाले की, जर मनसे आणि आमचे सर्व नगरसेवक एकत्र राहिले असते, तर कल्याण-डोंबिवली महापालिकेत एक ताकदीचा विरोधी गट उभा राहिला असता. मात्र स्थानिक पातळीवर घेतलेल्या या निर्णयामुळे ती संधी गमावली गेल्याचं त्यांनी सूचकपणे नमूद केलं.
नगरसेवकांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. आम्हाला सत्ताधारी आणि इतर पक्षांकडून सतत संपर्क साधला जात असून विविध प्रस्ताव दिले जात आहेत, अशा परिस्थितीत नेमकं काय करावं, असा प्रश्न नगरसेवकांनी विचारला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितलं की, कोणताही प्रस्ताव आला तरी त्यावर पक्ष पातळीवरच निर्णय घेतला जाईल. सध्या कल्याण-डोंबिवली महापालिकेत आपण विरोधी बाकावर बसणार आहोत, हे निश्चित आहे.
BMC Elections: भाजपच्या बंडखोरीचा फटका, मुंबईत 11 जागांवर पराभव
विरोधी पक्षात बसलो तरी नगरसेवकांना सन्मानजनक वागणूक मिळेल, यासाठी पक्ष म्हणून आपण पूर्ण प्रयत्न करू, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी दिला. सत्तेत नसल्यामुळे दबाव किंवा प्रलोभनांना बळी पडण्याची गरज नाही, पक्ष तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असंही त्यांनी नगरसेवकांना धीर देत सांगितलं.
दरम्यान, मनसेकडून शिंदेसेनेला पाठिंबा देण्यामागचं कारण स्पष्ट करताना मनसेचे नेते राजू पाटील यांनी सत्तेत नसल्यास काहीही मिळत नाही, तसेच केडीएमसीमध्ये सुरू असलेला राजकीय खेळ थांबवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. स्थानिक परिस्थितीचा विचार करूनच हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असलं तरी, या निर्णयामुळे ठाकरे गटात तीव्र अस्वस्थता निर्माण झाल्याचं चित्र आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 2026 च्या निवडणूक निकालानुसार शिवसेना (शिंदे गट) 53, भाजप 50, ठाकरे गटाची शिवसेना 11, मनसे 5, काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 1 अशा जागा मिळाल्या असून एकूण सदस्यसंख्या 122 आहे. या संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या भूमिकेमुळे स्थानिक राजकारणाची दिशा बदलली असून, आगामी काळात ठाकरे गटाची रणनीती काय असेल, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.








