Wife leaves home; Political turmoil in Nagpur Municipal Corporation elections : बायकोने घरच सोडलं; नागपूर महापालिका निवडणुकीत राजकीय खळबळ
Nagpur : नागपूर महापालिका निवडणुकीतील बंडखोरीच्या राजकारणाने आता थेट घराघरात धक्का देणारे नाट्य समोर आले आहे. पतीने भाजपविरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्नीने घर सोडून माहेर गाठल्याची घटना नागपूरमध्ये घडली असून, या कौटुंबिक संघर्षाची शहरभर जोरदार चर्चा सुरू आहे.
राज्यभरात महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू असून, तिकीट न मिळाल्याने अनेक ठिकाणी बंडखोरीचे सूर उमटले आहेत. या बंडोबांना थंड करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असतानाच नागपूरमधील एका बंडखोरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. भाजपमधील या बंडखोरीचा थेट परिणाम माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या वैयक्तिक आयुष्यावर झाल्याचे चित्र समोर आले आहे.
Municipal Election 2026: २९ महापालिकांतील २८६९ जागांसाठी ३३ हजारांहून अधिक उमेदवार
भाजपने नागपूरच्या प्रभाग क्रमांक १७ मधून मनोज साबळे यांना उमेदवारी दिली आहे. मनोज साबळे हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले असल्याने पक्षाने ऐनवेळी त्यांना तिकीट दिले. त्यामुळे याच प्रभागातून इच्छुक असलेले अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर नाराज झाले. आपल्यालाच उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा असताना तिकीट कापल्याने त्यांनी थेट बंडखोरीचा मार्ग स्वीकारला.
विनायक डेहनकर यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे अर्चना डेहनकर या पक्षनिष्ठा आणि पतीचा निर्णय या कात्रीत सापडल्या. अखेर त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेत पतीचे घर सोडले आणि नागपुरातील भावाच्या घरी जाण्याचा कठोर निर्णय घेतला.
अर्चना डेहनकर या २००९ ते २०१२ या कालावधीत भाजपच्या तिकिटावर नागपूरच्या महापौर होत्या. भाजपमुळेच आपल्याला राजकीय ओळख मिळाल्याने पक्षाविरोधात जाणे त्यांना मान्य नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता त्या थेट पतीच्या विरोधात भाजपच्या उमेदवारासाठी प्रचार करताना दिसणार आहेत. या घटनेने नागपूरच्या राजकारणातच नव्हे तर सामाजिक वर्तुळातही खळबळ उडाली आहे.
दरम्यान, नागपूरमध्ये आणखी एका बंडखोरीची चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे माजी स्वीय सहाय्यक आणि संघाच्या एकनिष्ठ स्वयंसेवकाच्या मुलानेही भाजपविरोधात पाऊल उचलले आहे. निनाद दीक्षित यांनी प्रभाग क्रमांक २२-डी मधून फॉरवर्ड ब्लॉकच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संघ मुख्यालय असलेल्या भागातच स्वयंसेवकाच्या कुटुंबातील व्यक्तीने बंडखोरी केल्याने या प्रभागात भाजपची खरी कसोटी लागणार असल्याचे बोलले जात आहे.
BMC Election 2026: रामदास आठवलेंनी ३९ उमेदवार उतरवताच १२ जागा देण्यावर सहमती
एकीकडे नवरा-विरुद्ध-बायको असा राजकीय संघर्ष, तर दुसरीकडे संघाशी संबंधित कुटुंबातील बंडखोरी, अशा दोन वेगवेगळ्या घटनांमुळे नागपूर महापालिका निवडणूक अधिकच रंगतदार आणि तणावपूर्ण बनली आहे. आता या बंडखोरांचा निवडणूक निकालावर नेमका काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








