Voting halted in Akola, Yavatmal, Phaltan due to technical glitch : अकोला, यवतमाळ, फलटणमध्ये तांत्रिक बिघाडामुळे मतदान ठप्प
Mumbai: राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण 143 सदस्यपदांसाठी आज 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमधील तांत्रिक बिघाडामुळे निवडणूक प्रक्रियेचा बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. थंडीच्या कडाक्यातही मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले असतानाच अकोला, यवतमाळ आणि फलटण येथे मतदान केंद्रांवर ईव्हीएम बंद पडल्याने काही काळ मतदान ठप्प राहिले, तर काही ठिकाणी मतदारांची मोठी रांग लागली.
अकोल्याच्या बाळापूर नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 5 मधील बूथ क्रमांक एकवर सकाळच्या सत्रात ईव्हीएम मशीन अचानक बंद पडली. या बिघाडामुळे जवळपास 20 मिनिटे मतदान प्रक्रिया थांबली होती. कासारखेड येथील जुनी इमारत दक्षिण भागातील नगरपरिषद प्राथमिक मराठी शाळा या मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. प्राथमिक तपासणीत मशीनच्या सॉकेटमध्ये तांत्रिक दोष आढळून आला. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ दुसरी ईव्हीएम मशीन उपलब्ध करून दिल्यानंतर मतदान पुन्हा सुरू करण्यात आले. बंद पडलेल्या मशीनवर यापूर्वी 12 मतदारांनी मतदान केले होते.
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंची शिक्षा कायम, मात्र अटक टळली
यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीदरम्यानही असाच प्रकार समोर आला. प्रभाग क्रमांक 27 मधील ध्रुव प्राथमिक शाळेतील खोली क्रमांक पाच येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सुमारे 20 मिनिटे मतदान प्रक्रिया बंद ठेवावी लागली. त्यामुळे मतदानासाठी आलेल्या नागरिकांची मोठी रांग लागली होती आणि मतदारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, फलटण नगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 13 येथील चार नंबरच्या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनचे बटन दाबले जात नसल्याने गोंधळ उडाला. या तांत्रिक अडचणीमुळे मतदान प्रक्रिया काही काळासाठी थांबवण्यात आली. घटनेची माहिती मिळताच समशेर सिंह नाईक निंबाळकर यांनी स्वतः मतदान केंद्रावर उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी केली.
kidney sale case : कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहाराची होणार सखोल चौकशी
दुसरीकडे, फुलंब्री येथे मतदानाच्या पार्श्वभूमीवर वेगळाच प्रकार समोर आला आहे. भारत माता शाळेच्या मतदान केंद्राबाहेर जादूटोण्याचा संशयास्पद प्रकार आढळून आला. काळी बाहुली, त्यात टोचलेल्या पिना, लिंबू आणि इतर साहित्य आढळल्याने परिसरात चर्चेला उधाण आले. हा प्रकार नेमका कोणी आणि कशासाठी केला, याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही.
राज्यात सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया सुरू असून, काही ठिकाणी संथ गतीने तर काही ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र, ईव्हीएममधील तांत्रिक बिघाडांमुळे मतदारांची गैरसोय होत असून निवडणूक यंत्रणेच्या तयारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
___








