Anger of Nagpur workers erupts in front of senior Congress leader : शहर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, माजी केंद्रीय मंत्र्याला भेटण्यापासून रोखले
Nagpur नागपूर शहर काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला असून, ‘संघटन सृजन अभियाना’च्या नावाखाली सुरू असलेल्या प्रक्रियेत कार्यकर्त्यांच्या भावनांचा मोठा उद्रेक झाला आहे. शहर काँग्रेसचा नवा अध्यक्ष सर्वांच्या संमतीने निवडला जाणार असल्याचा दावा पक्षाकडून केला जात असला तरी, प्रत्यक्षात मात्र आज नागपुरात वेगळेच चित्र पाहायला मिळाले. या निवडीसाठी सर्वांशी चर्चा करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव नागपुरात दाखल झाले असताना, कार्यकर्त्यांना त्यांना भेटण्यापासून रोखण्यात आल्याने प्रचंड गोंधळ उडाला.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत, आम्ही कोणालाही जुमानत नाही, असा थेट इशाराच नेत्यांना दिला आहे. या गोंधळानंतर विद्यमान शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे आणि त्यांच्या विरोधकांमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आहे. अरुण यादव यांच्या भेटीत अडथळा निर्माण करून लोकशाही मार्गाने चालणारी प्रक्रिया दडपली जात असल्याचा आरोप विरोधी गटाने केला आहे.
दुसरीकडे, कार्यकर्त्यांच्या या संतापामुळे देवडिया काँग्रेस भवन तसेच रवी भवनच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हायकमांडने पाठवलेल्या निरीक्षकासमोरच पक्षातील गटबाजी उघड झाल्याने काँग्रेसच्या ‘सृजन’ अभियानावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता हायकमांड या बंडाला कसे शांत करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पर्यवेक्षक पाच दिवसांच्या मुक्कामाला नागपूर मध्ये आले आहेत. विधानसभा निहाय ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करीत आहेत. इच्छुक अध्यक्षांना अर्ज मागण्यात आले आहेत. 15 एप्रिलला रविभवन येथे सर्वांच्या मुलाखती घेणार आहेत.








