Vikas Thakre group attacks on praful gudadhe : अतुल लोंढेंची कोंडी, काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
Nagpur नागपूर विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली असली, तरी नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता थेट चव्हाट्यावर आला आहे. तब्बल १३ वर्षे नागपूर शहराध्यक्ष राहिलेले आमदार विकास ठाकरे यांना हटवून त्यांच्या जागी प्रफुल गुडधे यांची नियुक्ती केल्याने ठाकरे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत.
हे लोक आजवर कुठे होते? असा थेट आणि रोखठोक सवाल करत ठाकरे गटाने नवनियुक्त शहराध्यक्ष आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध थेट शड्डू ठोकला आहे. विकास ठाकरे शहराध्यक्ष असताना प्रफुल गुडधे आणि त्यांचे समर्थक कधीच देवडिया भवनात आले नाहीत, पक्षाच्या एकाही आंदोलनात ते कधी दिसले नाहीत; मग आता आम्ही त्यांच्या पाठीशी का उभे राहायचे आणि त्यांच्या कार्यक्रमांना का जायचे, असा संताप ठाकरे समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे. या अंतर्गत बंडामुळे नागपूर विधान परिषदेच्या जागेवर काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
Rajura murder case: गाजावाजा मोठा; तपास मात्र ठरला वादग्रस्त, चार पोलिस कर्मचारी निलंबित
या तीव्र नाराजीमुळेच ठाकरे गटाने काँग्रेसच्या निवडणूक घडामोडींकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. प्रफुल गुडधे यांच्या नेतृत्वात झालेल्या पहिल्याच इंधन दरवाढ आंदोलनात ठाकरे गट कुठेही दिसला नाही. एवढेच नव्हे तर विधान परिषदेचा उमेदवार निश्चित करण्यासाठी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीला आणि अतुल लोंढे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हाही ठाकरे गटातील एकही नेता फिरकला नाही. आमदार ठाकरे शहरात नसल्याचे ‘ठेवणीतील’ उत्तर दिले जात असले, तरी ही अनुपस्थिती म्हणजेच त्यांची जाहीर नाराजी असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
Bacchu kadu : राजुरा प्रकरणावर बच्चू कडू आक्रमक; सीबीआय चौकशीसाठी आंदोलनाचा इशारा
नागपूर महानगरपालिकेत काँग्रेसचे एकूण ३३ नगरसेवक असून यातील तब्बल ९० टक्के नगरसेवक हे विकास ठाकरे यांचे खंदे समर्थक आहेत. हे सर्व नगरसेवक आमदार ठाकरे जो आदेश देतील त्याचेच तंतोतंत पालन करणार आहेत. विशेष म्हणजे लोंढे यांची उमेदवारी निश्चित करण्यात माजी मंत्री सुनील केदार, आमदार नितीन राऊत आणि प्रफुल गुडधे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, मात्र या नेत्यांसोबत विकास ठाकरे यांचे संबंध आधीच कमालीचे ताणलेले आहेत. अशा परिस्थितीत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर विसंबून न राहता अतुल लोंढे यांना स्वतःच पुढाकार घेऊन ठाकरे गटाची मनधरणी करावी लागणार आहे.
आमदार विकास ठाकरे उद्या गुरुवारी नागपुरात परतत असून त्यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाची एक तातडीची बैठक होणार आहे. या बैठकीत हे लोक आजवर कुठे होते? या सवालासह निवडणुकीत नेमकी काय भूमिका घ्यायची, याचा अंतिम फैसला केला जाईल. त्यामुळे उद्याच्या या बैठकीकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








