Nagpur crime : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखावर गंभीर गुन्हा

Allegations of casteist abuse and death threats : जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप

Nagpur: नागपूर शहरात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मोहन श्यामराव गोजे यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली मोहन गोजे आणि त्यांचा मुलगा सूरज मोहन गोजे या दोघांविरोधात शनिवारी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हुडकेश्वर परिसरातील चापरे कुटुंबाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ओळखीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून त्यांनी १७ ऑगस्ट २०२० रोजी मोहन गोजे यांच्याकडे १११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने गहाण ठेवले होते. त्याबदल्यात १.५ टक्के व्याजदराने ३ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या व्यवहारासाठी १०० रुपयांच्या मुद्रांकावर करारनामा करण्यात आला होता आणि चंद्रशेखर महिंद्रकर यांच्या उपस्थितीत हा व्यवहार पार पडला होता.

Local body elections : १२ जिल्हा परिषदांसह १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका लवकरच

२०२४ मध्ये घनश्याम चापरे यांनी कर्जाची संपूर्ण रक्कम परत करून गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने परत मागितले. मात्र त्यानंतर मोहन गोजे यांनी वारंवार दागिने परत देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. जुलै महिन्यात गोजे यांनी चापरे यांना जागनाथ बुधवारी येथील त्यांच्या मुलाच्या कार्यालयात बोलावले.

तेथे दागिने परत देण्याऐवजी जातीवाचक भाषा वापरत तुमच्या समाजातील लोकांना इतके सोने वापरण्याची लायकी नाही, असे अपमानास्पद विधान केल्याचा आरोप आहे. तसेच आपण राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याने तुम्ही माझे काहीही बिघडवू शकत नाही, असे म्हणत नग्न करून ठार मारण्याची धमकी दिल्याचे चापरे दाम्पत्याने तक्रारीत नमूद केले आहे.

BMC election : भाजप १२८ तर शिंदेंची शिवसेना ७९ जागा लढवणार

या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी चापरे दाम्पत्याने पोलिसांकडे धाव घेतली असता सुरुवातीला हुडकेश्वर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर या प्रकरणाची चर्चा शहरात रंगू लागली. अखेर शनिवारी हुडकेश्वर पोलिसांनी मोहन गोजे आणि सूरज गोजे यांच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखावर जातीवाचक शिवीगाळीसारख्या गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल झाल्याने भाजपा–शिवसेना युतीसाठी ही बाब अडचणीची ठरू शकते. एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या गोजे यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे शिवसेनेला निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच या मुद्यावरून विरोधकांना आयतेच कोलीत मिळणार असून, प्रचाराच्या काळात आरोप–प्रत्यारोप अधिक तीव्र होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

___