Breaking

Nagpur Improvement Trust : नागपुरातील शिवसृष्टी प्रकल्प रखडला !

ShivSrushti project in Nagpur stalled Nagpur Improvement Trust : दीड वर्षांपूर्वी झाली होती घोषणा; जागाच मिळाली नाही

Nagpur पुण्यातील प्रकल्पाच्या धर्तीवर नागपुरातही शिवसृष्टी प्रकल्पाची घोषणा दीडवर्षांपूर्वी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रांचे दर्शन घडविणारा हा प्रकल्प आहे. वर्धा मार्गावरील रहाटे कॉलनी चौकाजवळील कृषी विद्यापीठाच्या पाच एकर जागेवर साकारण्याचे नियोजनही करण्यात आले. मात्र दीड वर्षांत जागाच मिळाली नसल्याने या प्रकल्पाचे कामही रखडले आहे.

नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्त मंडळाच्या १४ जुलै २०२३ रोजी या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती. या प्रकल्पासाठी टोकन स्वरूपात ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मार्च २०२४ मध्ये नासुप्रने सादर केलेल्या अर्थसंकल्पात ही तरतूद केली होती. राज्य शासनाकडून यासाठी निधी प्राप्त होणार होता. नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांचे गौरवशाली चरित्र माहीत व्हावे. त्यांना यापासून प्रेरणा मिळावी. यासाठी हा प्रकल्प तयार करण्यात येणार असल्याचे नासुप्रकडून सांगण्यात आले होते.

पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाची ५ एकर जागा संपादित करण्याची प्रक्रियाही हाती घेण्यात आली होती. मात्र दीड वर्षांत हा प्रकल्प केवळ कागदावरच राहिल्याने खंत व्यक्त केली जात आहे.

१४ किल्ल्यांची प्रतिकृती साकारणार
या प्रकल्पाची जबाबदारी नासुप्रवर सोपविण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १४ किल्ल्यांची प्रतिकृती येथे तयार करण्यात येणार आहे. १० लाइट्स आणि ‘साउंड शो’ च्या माध्यमातून येथे शिवरायांचे चरित्र नव्या पिढीपर्यंत पोहचविण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते. या प्रकल्पाला गती देऊन नागपूरच्या पर्यटन क्षेत्रात भर घालण्याची मागणी नागपूरकरांकडून करण्यात येत आहे. जागेअभावी या प्रकल्पाच्या कामाला गती मिळू शकली नाही. विकास आराखडाही तयार होऊ शकला नाही. मात्र याकडे तातडीने लक्ष दिले जाईल, असे नासुप्रकडून सांगण्यात येत आहे.

या प्रकल्पांनाही मिळावी गती
नासुप्रच्या अर्थसंकल्पात इतर प्रकल्पांचीही घोषणा करण्यात आल्या होत्या. टेकडीवरील गणपती अशी ओळख असलेल्या नागपुरातील प्राचीन गणेश मंदिर परिसराचा विकास करण्यात येईल. पार्किंग सुविधा, भव्य सभामंडप, ग्रंथालय अशी विविध विकासकामे करण्यात येणार असल्याचेही नमूद करण्यात आले होते. सक्करदरा येथील मौजा हरपूर येथील जागेवर छत्रपती संभाजी महाराज सभागृह व क्रीडा संकुल बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पांनाही गती मिळावी, अशी अपेक्षा नागपूरकरांकडून करण्यात येत आहे.