Nagpur Municipal Corporation : भाजपची सत्ता, बेरोजगारांची फसवणूक अन् पोलीस तक्रार

Fake recruitment advertisements flood social media : महापालिकेत भरतीच्या नावाखाली सोशल मीडियावर ‘फेक’ जाहिरातींचा सुळसुळाट

Nagpur बेरोजगार युवकांच्या फसवणुकीसाठी सध्या नवनवीन फंडे वापरले जात असून, आता थेट नागपूर महानगरपालिकेच्याच नावाने बनावट पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या प्रत्येक झोनमध्ये ‘प्रिंटर ऑपरेटर व डॉक्युमेंट स्कॅनर’ भरती करायचे असल्याचे सांगत सोशल मीडियावर ही जाहिरात व्हायरल करण्यात आली. हा गंभीर प्रकार लक्षात येताच राजकीय वातावरण तापण्यापूर्वीच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून युवकांना सावध केले आहे. भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेच्या नावावर हा प्रकार होत आहे, याची सध्या चांगलीच चर्चा आहे.

इच्छुक युवक-युवतींनी महानगरपालिकेतील भरतीसाठी केवळ मनपाच्या अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा, सोशल मीडियावरील कोणत्याही अनधिकृत जाहिरातींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सध्या सोशल मीडियावर मनपामध्ये कंत्राटी पद्धतीने १०० जणांची भरती होणार असल्याची अफवा पसरवली जात आहे. यामध्ये प्रत्येक झोनमध्ये १० जणांची नियुक्ती केली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले असून, जाहिरातीवर दोन मोबाईल क्रमांकही देण्यात आले आहेत. हा सर्व प्रकार पैसे उकळण्याचा आणि बेरोजगारांची फसवणूक करण्याचा एक मोठा कट असल्याचे समोर आले आहे.

Ajit pawar plane crash : अजित पवार विमान दुर्घटनेतील ब्लॅक बॉक्स आगीत जळाला

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, मनपाच्या भरती प्रक्रियेसाठी कुणाशीही मोबाईलवर संपर्क साधण्याची आवश्यकता नसते. मनपाची भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून, कोणत्याही पदासाठी भरती करायची असल्यास केवळ मनपाच्या अधिकृत संकेतस्थळावरच जाहिरात प्रसिद्ध केली जाते. नागरिकांनी अशा वेळी https://www.nmcnagpur.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचाच आधार घ्यावा.

Nagpur Municipal Corporation : नागपूर महापालिकेचे भूखंड होणार ‘फ्री होल्ड’; हजारो मालकांना मिळणार कायमस्वरूपी मालकी हक्क

सोशल मीडियावरील या फेक जाहिरातींमुळे प्रशासनाची नाहक बदनामी होत असून, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मनपाच्या सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त राजकुमार मेश्राम यांनी सदर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली आहे. ही जाहिरात पूर्णपणे बनावट असून, युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्या संबंधितांवर त्वरित कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.