Roads dug at 800 places in Nagpur ahead of mansoon : पावसाळ्यात डबके नव्हे तळे तयार होईल; महापालिकेपुढे आव्हान
Nagpur नागपूरचे रस्ते चांगले झाले आहेत. आणखी चांगले होत आहेत. मात्र, रस्त्यांची कामे ज्या गतीने व्हायला हवीत, त्या गतीने होत नाहीत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नागपुरात जागोजागी डबके नव्हे तर तळे तयार होईल, एवढे खोदकाम झाले आहेत. नागपूरची ऐशीतैशी करण्यासाठी तब्बल ८०० ठिकाणी खोदकाम करून ठेवले आहे.
शहरात मान्सूनचे आगमन झाले असले तरी मनपा प्रशासनाची मान्सूनपूर्वीची तयारी झालेली नाही. शहरात केबल, जलवाहिनी, सिव्हर लाइन, ड्रेनेज लाइन आदी कामांसाठी ८०० ठिकाणी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. शहरात उड्डाणपुलाचे काम जोरात सुरू आहे. त्यामुळेही रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अशा स्थितीत मनपाची मोठी परीक्षा होणार आहे.
एमआरआयडीसी शहरात रस्ते व ओव्हर ब्रीजचे काम करीत आहे. गंगाबाई घाट ते जगनाडे चौकदरम्यान नाग नदीच्या पुलाच्या दोन्ही भागात खोदकाम करण्यात आले आहे. नासुप्रने बस टर्मिनलच्या प्रवेशद्वाराजवळ खड्डा करून ठेवला आहे. वर्धमाननगर ते केडीके कॉलेज दरम्यानच्या रस्त्याची अवस्था उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे खराब झाली आहे. येथे रस्त्यावर माती पसरलेली आहे. केडीके कॉलेज ते जगनाडे चौकदरम्यान रस्त्याच्या कामाची गती अतिशय सुस्त आहे. हॉटमिक्स विभागाने स्वत: जबाबदारी घेऊन रस्ते थोडे दुरूस्त केले. मात्र, उड्डाणपुलाचे काम करणारे त्या रस्त्यांना पुन्हा खोदत आहेत. त्यामुळे अशोक चौकात पाणी जमा होण्याची शक्यता आहे.
येथे उड्डाणपुलाचे मुख्य काम सुरू आहे. त्यामुळे नेहमीच ट्रॅफीक जाम होते. त्याच कारणाने मेडिकल चौकातही वाहतुकीचा खोळंबा होत आहे. महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी बैठक घेऊन शहरातील रस्ते ३१ मेपर्यंत पूर्ववत करावेत, असे सांगितले आहे. कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईचा इशाराही दिला आहे. मात्र, रस्ते बुजविण्याचे काम ज्या गतीने सुरू आहे, ते लक्षात घेता, दिलेल्या कालावधीत काम पूर्ण होणार नाहीच, असे स्पष्ट दिसत आहे.
मनपाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आयुक्तांनी कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ३१ मेनंतर दोन दिवस परिस्थिती बघू, त्यानंतर विभागाकडून कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येईल. जे अभियंते कंत्राटदाराला वाचविण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल.








