Detonator found at central avenue road nagpur, Suspicion of sabotage : सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले, पोलिस आयुक्त घटनास्थळी दाखल
Nagpur उपराजधानीतील अत्यंत गजबजलेल्या आणि संवेदनशील समजल्या जाणाऱ्या सेंट्रल येव्हेन्यू परिसरात स्फोटकांनी भरलेली एक बेवारस पिशवी आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हंसापुरी परिसरात ही घटना घडली असून, या घटनेने पोलीस प्रशासनासह सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता खुद्द पोलीस आयुक्तांसह बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (BDDS) तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
धक्कादायक बाब अशी की, ही स्फोटके असलेली पिशवी गेल्या महिनाभरापासून याच परिसरात पडून होती. आजवर केवळ एक बेवारस वस्तू म्हणून त्याकडे पाहिले जात होते, मात्र त्यामध्ये जिवंत ‘डिटोनेटर्स’ असल्याचे स्पष्ट होताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी ही पिशवी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे.
ज्या परिसरात ही स्फोटके सापडली, तो भाग सुरक्षा दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील मानला जातो. काही महिन्यांपूर्वीच औरंगजेबाच्या कबरीवरून याच परिसरात मोठी दंगल उसळली होती. त्या हिंसाचारात वाहनांची जाळपोळ, दगडफेक आणि पोलीस अधिकाऱ्यांवरील हल्ल्यांमुळे संपूर्ण नागपूर हादरले होते. या दंगलीप्रकरणी शेकडो जणांवर गुन्हे दाखल असून अनेकांवर देशद्रोहाचा गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. अशा तणावपूर्ण इतिहास असलेल्या हंसापुरी आणि सी.ए. रोड परिसरात स्फोटके सापडणे, हे कोणत्या मोठ्या कटाचे संकेत तर नाहीत ना? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, पिशवी पोलिसांच्या ताब्यात असून बॉम्ब शोधक पथक त्याची बारकाईने तपासणी करत आहे. ही पिशवी नक्की कोणाची आहे आणि ती तिथे कोणी ठेवली, याचा शोध सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे घेतला जात आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये.”
Baramati bypoll : “महाविकास आघाडीतल्या एकाही पक्षाचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा नाही”
दरम्यान, महिनाभरापासून ही स्फोटके तिथेच पडून होती, या दाव्यामुळे पोलिसांच्या गस्तीवर आणि गुप्तचर यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ही स्फोटके दंगलीच्या संशयित आरोपींशी संबंधित आहेत का, यादृष्टीनेही आता कसून तपास केला जात आहे.








