nagpur winter session, bhaskar jadhav nana patole demand extension fadnavis reply : आचारसंहितेमुळे अधिवेशनाचा कालावधी मर्यादित ठेवाफडणवीसांचं थेट उत्तर
Nagpur: महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन केवळ १४ डिसेंबरपर्यंत मर्यादित ठेवण्यात आले आहे. विदर्भाशी संबंधित प्रश्न प्रामुख्याने चर्चिले जाणाऱ्या या अधिवेशनाचा कालावधी कमी असल्याबाबत विरोधकांनी आज पहिल्याच दिवशी आक्रमक भूमिका घेतली. शिवसेना (ठाकरे गट) नेते आमदार भास्कर जाधव आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची जोरदार मागणी केली.
कामकाज सुरू होताच भास्कर जाधव यांनी अधिवेशन कमी कालावधीत आयोजित केल्याबद्दल सरकारवर नाराजी व्यक्त केली. “हिवाळी अधिवेशन हे विदर्भाचे असून, विदर्भ करारानुसार पुरेसा कालावधी देणे आवश्यक आहे. ८ डिसेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत अधिवेशन व्हावे असा आमचा आग्रह होता. किमान एक आठवडा जरी अधिक वाढवला तरी आम्ही स्वागत करू. पण आमच्या मतांवरुन संशय निर्माण होईल असे वातावरण सरकारने तयार करू नये,” असे ते म्हणाले. त्यानंतर नाना पटोले यांनीही अधिवेशन वाढवण्याची मागणी पुढे नेली. “महाराष्ट्र एकत्रिकरणानंतर किमान दोन महिने अधिवेशन नागपूरमध्ये आयोजित करण्याचे ठरले होते. पूर्वी सरकार विरोधात असताना अधिवेशन एक महिना चालत असे. आज मात्र सरकार घाईघाईने पुरवणी मागण्या मांडून कामकाज संपवू इच्छिते. एवढी घाई का?” असा प्रश्न पटोलेंनी विचारला.
PM narendra Modi : मुस्लिम लीग, नेहरू… वंदे मातरम् राष्ट्रगानाच्या चर्चेत
या मागण्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आक्षेपांना ठाम प्रत्युत्तर दिले. “पुरवणी मागण्या व विधेयकांची ओळख पहिल्याच दिवशी करून देणे हा नियम आहे. मागील २५ ते ५० वर्षांच्या नोंदी पाहिल्यास यापेक्षा वेगळा अजेंडा पहिल्या दिवशी कधीच दिसणार नाही. अधिवेशन जास्तीत जास्त चालावे ही आमचीही इच्छा आहे. नागपूरमध्ये सर्वाधिक काळ अधिवेशन चालले ते माझ्या कार्यकाळात आहे आणि पुढेही चालेल,” असे फडणवीस म्हणाले. मात्र आचारसंहितेमुळे अधिवेशनाचा कालावधी मर्यादित ठेवावा लागल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले. “आचारसंहिता लागू आहे आणि कधीही आणखी निवडणुकांची घोषणा होऊ शकते. त्यामुळे पहिला आठवडा आणि आणखी दोन दिवस अशा रचनेत अधिवेशन निश्चित केले आहे. उर्वरित दिवस पुढील अधिवेशनात समायोजित करू,” असेही त्यांनी सांगितले.
MSRTC : बनावट ओळखपत्रांवर लुटल्या सवलती, ८० प्रवाशांवर कारवाई
यानंतरही नाना पटोले यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अधिवेशन वाढवण्याची विनंती केली. त्यावर पुन्हा प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, “नाना पटोले यांनी आग्रह मांडला हे ठीक आहे, पण ते अध्यक्ष असताना मुंबईतील अधिवेशने केवळ ३ आणि ५ दिवसांची झाली होती. तेव्हा बाकी राज्यांत अधिवेशने १५–२० दिवस चालू होती. तिथे कोरोनाचा धोका नव्हता का? महाराष्ट्रातच फक्त अत्यल्प कालावधीची अधिवेशने झाली होती,” असे सांगत त्यांनी पटोलेंना स्मरण करून दिले.
पहिल्याच दिवशी झालेल्या या वादानंतर संपूर्ण अधिवेशनात विरोधक सरकारवर दबाव वाढवतील का, आणि सरकार त्याविरोधात काय भूमिका घेते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
———








