Namo Kisan Scheme : नमो शेतकरी’च्या हप्त्याची प्रतीक्षा कायम!

Farmers await the eighth instalment : बँका-कृषी कार्यालयांत शेतकऱ्यांच्या चकरा; जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी मिळणार का निधी?

Buldhana राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत तीन हप्त्यांत थेट बँक खात्यात जमा केली जाते. मात्र या योजनेचा आठवा हप्ता अद्याप जमा न झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी बँका व कृषी कार्यालयांत वारंवार चौकशीसाठी चकरा मारत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता लवकर जमा होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमध्ये होती. मात्र प्रत्यक्षात ही अपेक्षा अद्याप फोल ठरली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता सुमारे महिनाभरापूर्वीच वितरित झाला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी’ योजनेकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Maratha reservation : मराठा समाजासाठी न्यायालयाऐवजी संवादाचा नवा मार्ग

ई-केवायसी प्रक्रियेच्या पडताळणीदरम्यान लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे पात्रता व कागदपत्रांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

अडचणीच्या काळात या योजनेतून मिळणारी आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरते. मात्र हप्त्याला होत असलेला विलंब शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे. शासनाकडून निधी प्राप्त होताच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम तातडीने वर्ग केली जाईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांनी ती त्वरित करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

योजनेचा हप्ता नेमका कधी जमा होणार, हा प्रश्न शेतकरी सातत्याने उपस्थित करीत आहेत. आयकर भरणारे शेतकरी, शासकीय सेवेत असलेले तसेच ई-केवायसी पूर्ण न केलेले शेतकरी या योजनेतून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे आता केवळ गरजू व पात्र शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.

सध्या जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता राज्यातील १२ जिल्ह्यांत लागू आहे, तर उर्वरित २० जिल्ह्यांत ती लागू नाही. त्यामुळे या योजनेचा निधी वितरित होण्यास कोणताही कायदेशीर अडसर नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता आधीच जमा झाला आहे. आता राज्य सरकारकडील ‘नमो शेतकरी’ निधीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता लवकर मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Mahayuti Government : २३ महिन्यांचा कोरोना भत्ता थकीत; सरकारच्या उदासीनतेविरोधात देऊळगाव राजात संताप

नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे, आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक करणे, जमिनीच्या नोंदीतील त्रुटी दुरुस्त करणे आवश्यक आहे. अन्यथा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

योजनेचा आठवा हप्ता जमा न झाल्याने लाभार्थी शेतकरी बँका व कृषी कार्यालयांत चौकशीसाठी धाव घेत आहेत. कधी पोर्टल बंद असणे तर कधी तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.