narhari-zirwal-bribery-case-ncp-core-committee-meeting-sunetra-pawar : सुनेत्रा पवारांनी बोलावली तातडीची कोअर कमिटी बैठक
Mumbai : अन्न व औषध प्रशासन खात्यातील लाचखोरी प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणात मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत सापडले आहेत. मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात कार्यरत असलेले लिपिक आलोसे राजेंद्र ढेरंग यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पैसे स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. अजित पवार यांच्या पश्चात पक्ष पहिल्यांदाच मोठ्या राजकीय कोंडीत सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
राजेंद्र ढेरंग यांनी एका औषध विक्रेत्याचा निलंबित परवाना मंजूर करून देण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. यापैकी ३५ हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना जाळ्यात अडकवले. या कारवाईनंतर प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. संबंधित प्रकरण थेट मंत्र्यांच्या कार्यालयाशी जोडले गेल्याने झिरवळ यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणीही काही ठिकाणी जोर धरत आहे.
दरम्यान, या प्रकरणानंतर झिरवळ शनिवारी दिवसभर संपर्काबाहेर असल्याची चर्चा रंगली होती. ते आदिवासी संमेलनाला जाणार असल्याचे सांगितले जात होते; मात्र तेथेही ते अनुपस्थित राहिल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले. पक्षातील बहुतांश वरिष्ठ नेते या प्रकरणावर मौन बाळगून असल्याचे दिसून आले, तर केवळ अमोल मिटकरी यांनी झिरवळ यांच्या समर्थनार्थ भूमिका मांडल्याचे समजते.
विरोधकांनी या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करत टीकेची झोड उठवली आहे. परिणामी पक्ष बचावात्मक भूमिकेत गेल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेत सोमवारी सायंकाळी सहा वाजता पक्षाच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत लाचखोरी प्रकरणाची सविस्तर माहिती घेत पुढील भूमिका निश्चित केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.
बैठकीत केवळ झिरवळ प्रकरणाचाच आढावा घेतला जाणार नाही, तर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीवरही चर्चा होणार आहे. पुढील पंधरा दिवसांत निवड प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
लाचखोरी प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वादळात नरहरी झिरवळ यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पक्ष कोणती अधिकृत भूमिका जाहीर करतो आणि झिरवळ यांच्याबाबत काय निर्णय घेतला जातो, यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील राजकीय वाटचालीचे चित्र स्पष्ट होणार आहे.








