31 out of 121President Police Gallantry Medals awarded to Gadchiroli jawans : 121 पैकी 31 राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक गडचिरोलीच्या जवानांना
Gadchiroli : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून देशातील पद्म पुरस्कारांसह पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शौर्य व उत्कृष्ट सेवेबद्दलचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. या घोषणेत नक्षलप्रभावित आणि दुर्गम भागात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या गडचिरोली पोलीस दलाच्या शौर्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. देशभरात जाहीर झालेल्या एकूण 121 राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकांपैकी तब्बल 31 पदके एकट्या गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व जवानांना जाहीर झाली असून, ही बाब गडचिरोली पोलिसांच्या इतिहासातील अभिमानास्पद क्षण मानली जात आहे.
जिल्ह्याच्या सीमावर्ती व अतिदुर्गम जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवताना गडचिरोली पोलिसांनी वेळोवेळी दाखवलेले धैर्य, शिस्त आणि रणनीती याचे हे मोठे फलित असल्याचे मानले जात आहे. विशेषतः 22 एप्रिल 2018 रोजी भामरागड तालुक्यातील बोरीया-कसनासूरच्या घनदाट जंगलात झालेल्या ऐतिहासिक चकमकीने देशभराचे लक्ष वेधले होते. या भीषण चकमकीत गडचिरोली पोलीस दलाने 40 नक्षलवाद्यांना ठार करत नक्षलविरोधी अभियानातील आजवरची सर्वात मोठी आणि यशस्वी कारवाई केली होती. या मोहिमेत प्रत्यक्ष शौर्य गाजवणाऱ्या पोलीस निरीक्षक अमोल फडतरे, पोलीस उपनिरीक्षक मधुकर नैताम, वासुदेव मडावी, विलास पोरतेट, संतोष नैताम यांच्यासह एकूण 31 अधिकारी व जवानांच्या कामगिरीला राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
या पुरस्कारांमुळे नक्षलप्रभावित भागात तैनात असलेल्या जवानांचे मनोबल उंचावले असून, जिल्ह्यातील पोलीस दलात आनंद आणि अभिमानाचे वातावरण आहे. शौर्य पदकांसोबतच राज्यातील 394 पोलीस अंमलदारांना पदोन्नती जाहीर करण्यात आली आहे. कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेल्या 14 शहीद जवानांचाही यावेळी मरणोत्तर सन्मान करण्यात आला आहे. यामध्ये सात हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर, तर सात पोलीस नाईकांना पोलीस हवालदार पदावर मरणोत्तर पदोन्नती देण्यात आली आहे. याशिवाय विशेष कामगिरीबद्दल 10 जवानांना वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली असून, त्यात 82 हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षक तर 303 पोलीस नाईकांना पोलीस हवालदार पदावर बढती देण्यात आली आहे.
दरम्यान, भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील एकूण 982 अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली असून, त्यात महाराष्ट्रातील 89 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील राज्य गुप्त वार्ता विभागाचे पोलीस उपनिरीक्षक गंगाधर घुमरे यांनाही त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे मेडल फॉर मेरिटोरियस सर्व्हिस (MSM) जाहीर झाले आहे. 1991 च्या बॅचचे पोलीस अंमलदार असलेले घुमरे हे भंडारा जिल्ह्यातील एकमेव राष्ट्रपती पदक विजेते उपनिरीक्षक ठरले आहेत.
Local body elections : वाद टाळा, समजून घ्या; महायुतीचा एकोपा महत्त्वाचा
गडचिरोली आणि भंडाऱ्यासह संपूर्ण विदर्भासाठी हा सन्मान अभिमानास्पद असून, देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी योगदान देणाऱ्या पोलीस दलाच्या कार्याची पावतीच असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.








