Rahul Gandhi challenged to recite at least one Article of the Constitution without looking at the book : नवनीत राणा यांचे राहुल गांधी यांना आव्हान
Akola “राहुल गांधींनी संविधानाचे पुस्तक हातात न घेता त्यातील कलमे सांगून दाखवावीत. त्यांनी तसे केले तर मी राजकारण सोडेन,” असे थेट आव्हान माजी खासदार नवनीत राणा यांनी अकोट येथील सभेत काँग्रेस नेते राहुल गांधींना दिले.
विधानसभा निवडणुकीत भाजपने राज्यात ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा दिला होता. या घोषणेवर विरोधकांनी मोठ्या प्रमाणात टीका केली होती, मात्र लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतांचा वाढलेला कल लक्षात घेऊन हा मुद्दा विरोधकांनी विधानसभेतही प्रतिष्ठेचा केला होता. राज्यातील अनेक ठिकाणी भाजपनेही मुस्लिम उमेदवार दिलेले असतानाही नवनीत राणांनी अकोटच्या सभेत पुन्हा एकदा याच घोषणेचा उल्लेख केला. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भाजप पुन्हा ‘बटेंगे तो कटेंगे’ या मुद्द्याला हवा देत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Prakash Bharsakale : कोरोना काळात माझ्यासोबत काही तरी वाईट घडणार होते
दरम्यान, याच सभेत राणांनी राहुल गांधींना संविधानातील तरतुदींवरून दिलेले आव्हान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
अकोटमधील सभेत नवनीत राणांनी पुरुष मतदारांबाबतही एक विधान केले. त्या म्हणाल्या, “पुरुष मतदार अनेक पार्ट्यांमध्ये जातो आणि रात्री दोन वाजता घरी पोहोचतो, मात्र महिला मतदार अधिक इमानदार आणि एकनिष्ठ असतात. त्या कुणाच्या पैशाला बळी पडत नाहीत आणि कुणाच्या पार्टीत जातही नाहीत. ‘ती’ चटणी–भाकर खाईल, पण शेवटपर्यंत घर सांभाळेल.”
या विधानामुळे पुरुष मतदारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याचा सूर काही ठिकाणी उमटू लागला आहे. त्यामुळे या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








