NCP releases its election manifesto : १५० ‘पुणे मॉडेल’ शाळांसह खड्डेमुक्त रस्ते आणि आरोग्य विम्यात मोठी वाढ; राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध
Pune पुणे महानगरपालिका २०२६ च्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) अधिकृत हमीपत्र प्रसिद्ध केले. या घोषणापत्रात पुणेकरांसाठी ‘मोफत सार्वजनिक वाहतूक’ हे सर्वात मोठे आणि गेमचेंजर आश्वासन देण्यात आले आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या या जाहीरनाम्यातून अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी आपली अष्टसूत्री मांडली असून, ‘एकच वादा, अजित दादा’ या ब्रीदवाक्यासह मतदारांना साद घातली आहे.
पुणे शहराची वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषण लक्षात घेऊन, राष्ट्रवादीने सत्तेत आल्यास शहरांतर्गत मेट्रो आणि PMPML बस प्रवास पूर्णपणे मोफत करण्याची घोषणा केली आहे. या योजनेमुळे नागरिकांचा प्रवासाचा खर्च तर वाचेलच, पण खासगी वाहनांचा वापर कमी होऊन शहरातील ट्रॅफिक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघेल, असा दावा करण्यात आला आहे. युरोपीय शहरांच्या धर्तीवर पुण्यात सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरण करणे, हे पक्षाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी १५० नवीन ‘पुणे मॉडेल’ शाळांना मंजुरी देण्यात आली आहे. या शाळा सीबीएसई (CBSE) आणि आयसीएसई (ICSE) मानकांनुसार चालवल्या जातील. आधुनिक क्लासरुम्स, प्रयोगशाळा आणि प्रशिक्षित शिक्षकांसह मराठी भाषेचा पाया मजबूत ठेवून इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण सर्वसामान्यांच्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर (Property Tax) माफ करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्तावही यात मांडण्यात आला आहे.
fake certificate :‘दिव्यांग’ असल्याचा पुरावा कुठे? यूडीआयडी न दिल्याने संशय वाढला
शहरातील पायाभूत सुविधांबाबत भाष्य करताना, ९४० किलोमीटरच्या प्रलंबित रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. रस्ते खराब झाल्यास ७२ तासांच्या आत दुरुस्ती न केल्यास संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे कडक धोरण जाहीर केले आहे. तसेच, ‘शहरी गरीब आरोग्य योजने’अंतर्गत मिळणारी १ लाखांची मदत २ लाखांपर्यंत, तर दुर्धर आजारांसाठीची २ लाखांची मदत ५ लाखांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. उच्च दाबाने पाणीपुरवठा आणि झोपडपट्टी पुनर्वसन यावरही पक्षाने भर दिला आहे.
आगामी १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत हे ‘गाजर’ ठरणार की पुणेकरांच्या आयुष्यात खरोखर बदल घडवणार, याची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.








