नितीन गडकरी
(मंत्री, रस्ते वाहतूक व महामार्ग, भारत सरकार)
माझ्यासाठी मोठ्या भावासारखे असलेले ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ मेघे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या आठवणींचा पूर माझ्या मनात दाटून आला आहे. अतिशय लाघवी आणि सहयोगी स्वरुपाचे व्यक्तिमत्त्व दत्ताभाऊंना लाभले होते. ईश्वराच्या कृपने त्यांच्या वाट्याला जी काही समृद्धी आली, त्यातील वाटा गरजूंना मिळत राहावा, यासाठी त्यांनी आयुष्यभर धडपड केली. राजकारणात राहूनही अजातशत्रू ठरलेले दत्ताभाऊ हे एक आगळेवेगळे रसायन होते. त्यांच्याशी एकदा जोडली गेलेली व्यक्ती त्यांच्यापासून कधीही दुरावत नसे.
दत्ताभाऊंच्या जीवनाची सुरुवात अतिशय गरीब कुटुंबातून झाली. सीपी अँड बेरार कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. उदरनिर्वाह चालविण्यासाठी आईसफ्रुट विकले. जुन्या पुस्तकांचे दुकान लावले. त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून काम केले. युथ कॅडर नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. पुढे ते आमदारही झाले. शरद पवार साहेब पुलोदचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत काँग्रेस सोडली. त्यांचा राजकीय प्रवास रोमहर्षक होता. शिवाय, एखादा सामान्य आणि गरीब माणूस आपल्या जीवनात किती मोठे काम करू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण होते आमचे दत्ताभाऊ. लोकांसाठी शक्य ते सारे करत असताना त्यांनी आयुष्यभर सामाजिक बांधिलकी जपली. गोर-गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी सढळ हाताने मदत केली. त्यांच्याकडे गेलेला गरीब माणूस कधीही निराश होऊन परतला नाही. सतत मदत करण्याच्या त्यांच्या दानशूर वृत्तीची तुलना करायची असेल तर कर्णाशी करावी लागेल. विशेषतः मंत्री असताना पक्षातील असो वा बाहेरचे असो, त्यांनी उत्तम व्यवहार केला.
गरिबांबद्दल कळवळा आणि संवेदनशीलता हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. त्यांनी कायम लोकांचे हित साधण्याचा प्रयत्न केला. गरिबांची, उपेक्षितांची सेवा केली. राजकीयदृष्ट्या आपल्या बाजुचा आहे की विरोधातील आहे, याचा विचार न करता त्यांनी लोकांना मदत केली. त्याच काळात त्यांनी रविनगर सीपी अँड बेरार शाळेत फार्मसी कॉलेज सुरू केले. पुढे इंजिनियरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज सुरू केले आणि खूप मोठे साम्राज्य उभे झाले. दत्ताभाऊंनी राजकारण, शिक्षण, सहकार, समाजकारण अशा अनेक क्षेत्रांत आपला ठसा उमटवला.
Anjali damania : ‘सीडीआर’मध्ये संपर्कांचे जाळे, खरातला चाकणकरांचे 177 कॉल
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख ही त्यांची दिलदारी आणि आपुलकी हीच होती. आयुष्याच्या एका टप्प्यावर दत्ताभाऊ राजकारणात आले. आमदार- मंत्री-खासदार वगैरे झाले. परंतु, त्यांनी असंख्य माणसांशी जोडलेले नाते बदलले नाही. संस्थात्मक कार्यात दत्ताभाऊ आघाडीवर होते. त्यांनी शिक्षण संस्थांचे जाळे निर्माण केले. त्यातून शेकडो लोकांना रोजगार दिला आणि गरीब-गरजू मुलांच्या शिक्षणाचीही सोय केली. त्यांच्या संस्था म्हणजे अनेक गरिबांसाठी संधीचे दार होते. कित्येक विद्यार्थ्यांनी मोफत किंवा अल्प फी देऊन शिक्षण घेतले.
दत्ताभाऊंचा स्नेहभाव पक्षातीत होता. त्यामुळेच ते अजातशत्रू होते. राजकारणातले त्यांचे विरोधकही एका टप्प्यावर त्यांचे चाहते झाले ते त्यांच्या लाघवी व आपुलकीच्या स्वभावामुळे. विरोधकांशीही त्यांचे संबंध आत्मीयतेचे असायचे. आपल्यावर टीका करणाऱ्या नेत्यालाही गुपचूप आर्थिक मदत करणाऱ्या विरळा व्यक्तिमत्त्वाचे होते दत्ताभाऊ. त्यांच्यासाठी माणूस महत्त्वाचा होता, पक्ष नव्हे. दत्ताभाऊ म्हणजे असंख्य लोकांसाठी आधारवड होते. गेल्या काही वर्षांत आम्ही एकत्र येऊन ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्य सुरू केले होते. त्या कार्याला दत्ताभाऊंचा फार मोठा आधार होता. त्यांचे मार्गदर्शन लाभायचे.
ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने व समाधानाने जगता यावे यासाठी आपल्याकडून जे काही शक्य होईल, ते केले पाहिजे, यासाठी त्यांनी अखेरपर्यंत धडपड केली. शाळेत जाऊ इच्छिणारे लहानगे जीव असोत की दुसऱ्या बालपणाचा अनुभव घेत असलेले ज्येष्ठ नागरिक असोत, दत्ताभाऊ असंख्य माणसांचे आधार होते. सतत लोकांची मदत करीत होते. अशा माणसांच्या जाण्याने निर्माण होणारी पोकळी कधीही भरून निघत नाही. ती पोकळी शिल्लक ऊरतेच आणि असा माणूस लोकांच्या स्मृतीत चिरंतन स्थान निर्माण करतो. माझा त्यांच्याशी दीर्घ काळ संपर्क आला. एक सुसंस्कृत राजकारणी, समाजाभिमुख लोकनेता आणि गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी धावून जाणारे एक महान व्यक्तिमत्व म्हणजे आमचे दत्ताभाऊ.
माझे आणि त्यांचे मैत्रीचे नाते राजकारणाच्या पलीकडचे होते. आमचे कौटुंबिक ऋणानुबंध होते. त्यांच्या निधनामुळे आपण मोठ्या भावाला मुकल्याची माझी भावना आहे. त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.








