Appreciated the sculptors participated in Orange City Craft Mela : ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळ्यात फेरफटका
Nagpur केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राजकीय व्यासपीठांपेक्षा कलावंतांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये, उद्योजकांमध्ये जास्त रमतात. याची पुन्हा एकदा प्रचिती आली. गडकरींची शुक्रवारची (दि. १० जानेवारी) संध्याकाळ पूर्णपणे कलावंतांच्या सहवासात गेली. पहिले चित्रकला महाविद्यालयात आणि नंतर ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळा. क्राफ्ट मेळ्यात गडकरींनी फेरफटका मारला. याठिकाशी देशभरातून आलेल्या शिल्पकारांसोबत संवाद साधून त्यांच्या कलाकृतीचे त्यांनी कौतुकही केले.
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राद्वारे SCZCC ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गडकरींच्या हस्ते या मेळ्याचे उद्घाटन झाले. यावेळी गडकरींनी संवाद साधला. आपल्या देशात रोजगार निर्माण करण्यामध्ये हातमाग, हस्तकलेचे मोठे योगदान आहे. या कलेच्या वस्तू चांगल्या डिझाईनसह विकसित केल्या. त्यांची बाहेरील देशांत निर्यात करता आली. तर एकासह हजारोंना रोजगार मिळेल. व्यवसायाचे नवे दालन खुले होईल. त्यासाठी कारागिरांनी परिस्थितीनुसार व युवा पिढीच्या आवडीनिवडीनुसार डिझाईन बनवाव्या. जेणेकरून त्यांना एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते, असं गडकरी म्हणाले.
हातमाग हस्तकला ग्रामीण क्षेत्रात रुजवल्यास या क्षेत्रात समृद्धता आणि संपन्नता येईल, असा विश्वासही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. दहा दिवस चालणाऱ्या या मेळ्यामध्ये दीडशेहून अधिक कलाकार लोकनृत्य लोककला सादर करणार आहेत. या कलावंतांचे कौशल्य अनुभवण्यासाठी लोकांनी इथे यायला हवं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कलाकारांना त्यांच्या कलाकृती सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळ्याचा मूळ उद्देशच तो आहे, असं केंद्राच्या संचालक आस्था कार्लेकर म्हणाल्या. हस्तकला, लोककला त्याचप्रमाणे व्यंजन पाककृती यांचा सुरेख संगम या मेळ्यात आहे. हस्तकला मेळाव्यात १५० हस्तशिल्पकार सहभागी झाले आहेत. तर २०० हून अधिक आदिवासी लोककलावंत व इतर राज्यांमधील लोककलावंत सहभागी झाले आहेत. क्राफ्ट स्टॉल्ससोबतच भारतातील विविध राज्यांतील पारंपरिक भारतीय खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही खास आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.








