Nagpur
Ultimatum given for airport runway Recarpeting : विमानतळावरील नवीन धावपट्टीसाठी दिला आहे अल्टिमेटम
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी रिकार्पेटिंगच्या संथ कामावर नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना दणका दिला. त्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली व कामाला गती मिळाली. आता जिल्हाधिकारी व एमआयएलचे MIHAN अध्यक्ष-सीएमडी डॉ.विपीन इटनकर यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. आधीच गडकरींनी अल्टिमेटम दिल्यामुळे रिकार्पेटिंगचे काम वेगाने सुरू झाले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी देखील ठराविक मुदतीत काम पूर्ण करण्याचे आव्हान स्वीकारले आहे. 23 डिसेंबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या रिकार्पेटिंगच्या कामाची पाहणी करायला गेले. त्यावेळी तीन रोलर काम करत होते. मात्र उपस्थित अधिकाऱ्यांनी संबंधित कंपनीची तक्रार केली. आपण आले आहात म्हणून इथे तीन रोलर आहेत, मात्र रोज एकच रोलर काम करत असतो, असे गडकरींना सांगण्यात आले. त्यावरून गडकरींचा पारा चांगलाच भडकला. त्यांनी अधिकाऱ्यांसह कंपनीच्या लोकांना धारेवर धरले. संबंधितांना फोन करून ठणकावले. एक महिन्यात काम पूर्ण झाले नाही तर कारवाईचा इशाराही दिला.
गडकरींनी त्यावेळी कामाच्या संथ गतीवर नाराजी व्यक्त केली होती. त्याचवेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे काम महिनाभरात पूर्ण करण्याचे आदेश संबंधित कंपनी आणि प्रशासनाला दिले असल्याचे सांगितले. काम पूर्ण न झाल्यास कंपनी बदलविण्याचे सूतोवाच देखील गडकरींनी केले होते. अर्थात हे काम इंदुर येथील के.जी. गुप्ता या कंत्राटदार कंपनीला 22 जानेवारीपर्यंत पूर्ण करायचे आहे. परंतु कंपनीने रिकार्पेटिंगचे काम 21 मेपर्यंत पूर्ण करण्याची मुदत दिली आहे.
कंपनीला करावी लागेल कसरत
3 किमी लांब धावपट्टीचे काम मुदतीच्या चार महिन्यांआधी पूर्ण करण्यासाठी कंपनीला कसरत करावी लागेल. जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांच्याकडे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. ही जबाबदारी हाती घेतल्यानंतर मंगळवारी त्यांनी नागपूर विमानतळाच्या धावपट्टीच्या रिकार्पेटिंगच्या कामाची पाहणी केली. पाहणी दौऱ्यात त्यांनी विलंबाची कारणे जाणून घेतली आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांना काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.