Denies any association with the Vidarbha Sahitya Sangh elections : अनेकांचा दावा ठरला फोल, राजकारणी-व्यावसायिकांना साहित्य संस्थांपासून लांब राहण्याचा सल्ला
Nagpur केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे यांचा विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत गिरीश गांधी यांचे समर्थक आहेत, असा प्रचार गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. त्यासंदर्भात साहित्य क्षेत्रातून गडकरींवर जोरदार टीकाही सुरू होती. पण स्वतः गडकरी यांनी ‘या निवडणुकीशी माझा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध नाही’, असे स्पष्ट करून अनेकांचा दावा फोल ठरवला आहे.
विदर्भ साहित्य संघ या संस्थेची अध्यक्षपदाची निवडणूक कधी नव्हे तेवढी यंदा गाजत आहे. या निवडणुकीत साहित्यिक आणि लेखकांच्या गर्दीत राजकारणी, व्यावसायिक व असाहित्यिकांनीही अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अनेक वर्षे राजकारणात राहून सांस्कृतिक आणि सामाजिक कार्य करणारे गिरीश गांधी आणि वैद्यकीय क्षेत्रातील पूर्णवेळ व्यावसायिक असलेले डॉ. पिनाक दंदे या दोघांचा अर्ज आल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. दोघांचाही अस्सल साहित्याशी, लेखनाशी काय संबंध, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अश्यात नितीन गडकरी यांचा हस्तक्षेप असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या.
त्यावर ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी गडकरींना पत्र लिहीले. निवडणुकीत आपला हस्तक्षेप असण्याची शक्यता आम्हा साहित्यिकांना वाटत नाही. पण तो असेल तर ही चिंतेची बाब आहे, असे त्यांनी गडकरींना म्हटले. त्यावर गडकरींनी पत्राद्वारेच जोशींना उत्तर दिले आहे. या उत्तरात निवडणुकीशी आपला काहीही एक संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत माझा हस्तक्षेप असल्याच्या किंवा सहभाग असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये प्रकाशित होत आहेत. त्यात तथ्य नाही. उलट राजकारण्यांनी, व्यावसायिकांनी किंवा साहित्य क्षेत्राच्या बाहेरील मंडळींनी कधीही साहित्य संस्थांमध्ये हस्तक्षेप करू नये, असे मी नेहमी म्हणत असतो. त्यामुळे मी हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भंवत नाही, असे गडकरींनी म्हटले आहे.
Pune Municipal Corporation : तारीख ठरली; पुण्याला “या” दिवशी मिळणार हक्काचा महापौर
मी विदर्भ साहित्य संघाचा हितचिंतक आहे. शंभर वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या या संस्थेच्या कल्याणाचाच विचार मी करीत आलो आहे. आजची वर्तमान वास्तू पाडून त्याठिकाणी साहित्यिक व नाट्य चळवळीसाठी सोयीची अशी उत्कृष्ट वास्तू उभी व्हावी, असे माझे व्यक्तिगत मत आहे आणि ते यापूर्वी देखील होते. याठिकाणी साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील उपक्रमच आयोजित व्हावे. नवसाहित्यिकांना प्रोत्साहन मिळावे आणि जुन्या जाणत्यांचा सन्मान व्हावा, हाच माझा विचार आहे आणि एवढीच माझी या संस्थेच्या संदर्भात अपेक्षा आहे, असाही उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे.
विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाची व कार्यकारीणीची निवडणूक ही त्या संस्थेशी संबंधित एक प्रक्रिया आहे. आजपर्यंत या निवडणुकीशी कधीही माझा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नव्हता आणि आजही नाही. त्यामध्ये माझा सहभाग असण्याचेही काहीच कारण नाही. उलट निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी ज्या मंडळींनी उमेदवारी दाखल केली आहे अश्या सर्वच प्रकारच्या परस्पर विरोधी व्यक्तींसोबत माझे उत्तम व्यक्तिगत संबंध आहेत. त्यांनी एकत्र बसून, निवडणूक न होऊ देता, सर्वानुमते अध्यक्ष निवडण्याचा प्रयत्न करावा. विदर्भाच्या साहित्य क्षेत्राला नवी उभारी देण्यासाठी पोषक ठरेल, असे वातावरण तयार करू शकणारी कार्यकारीणीही सर्वानुमतेच निवडावी, असे मला मनापासून वाटते, या शब्दांत गडकरींनी आपली भूमिका मांडली आहे.








