Nitin Nabin : नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

Official announcement in Delhi, historic moment of leadership change : दिल्लीत अधिकृत घोषणा, नेतृत्वबदलाचा ऐतिहासिक क्षण

New Delhi : भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात नवे पर्व सुरू झाले असून नितीन नबीन यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात अधिकृतपणे ही घोषणा करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मावळते अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. भाजपाचे निवडणूक अधिकारी के. लक्ष्मण यांनी अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणूक प्रक्रियेची माहिती देत नितीन नबीन यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली आणि त्यांना निवडीचे प्रमाणपत्र प्रदान केले.

२०२० ते २०२४ या कालावधीत जे.पी. नड्डा यांनी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्यकाळानंतर आता नितीन नबीन यांच्याकडे पक्षाची सूत्रे आली आहेत. कार्यक्रमात बोलताना जे.पी. नड्डा यांनी ही निवड ऐतिहासिक असल्याचे सांगितले. जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदी तरुण, ऊर्जावान आणि अनुभवी नेतृत्व येत असल्याचा उल्लेख करत त्यांनी नितीन नबीन यांचे कौतुक केले. ते मूळचे संघटनेतून घडलेले कार्यकर्ते असून लहान वयातच पाच वेळा आमदार राहिले आहेत, बिहार सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत, तसेच राष्ट्रीय युवा मोर्चाचे महासचिव म्हणून देशभरात त्यांनी संघटनात्मक काम केले असल्याचे नड्डा यांनी नमूद केले. संघटनात्मक अनुभवासोबतच प्रशासकीय अनुभव असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वात भाजप अधिक बळकट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

BMC Mayor : आरक्षणाच्या त्या नियमामुळे भाजपचे स्वप्न धोक्यात!

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया सोमवारी पार पडली. रिटर्निंग ऑफिसर म्हणून के. लक्ष्मण यांनी ही प्रक्रिया हाताळली. नितीन नबीन यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. एकूण ३७ नामांकन संच सादर करण्यात आले असून ते सर्व वैध ठरले. यापैकी ३६ संच देशातील विविध राज्यांमधून आले होते, तर एक संच भाजप संसदीय मंडळाच्या सदस्यांकडून सादर करण्यात आला होता, ज्यामध्ये पंतप्रधान आणि ३७ खासदारांचा समावेश होता. अर्ज परत घेण्याच्या मुदतीनंतर नितीन नबीन यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.

६ एप्रिल १९८० रोजी स्थापन झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या इतिहासात अनेक दिग्गज नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवले आहे. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कुशाभाऊ ठाकरे, बंगारू लक्ष्मण, जना कृष्णमूर्ती, व्यंकय्या नायडू, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांच्यानंतर आता नितीन नबीन यांचे नाव या यादीत समाविष्ट झाले आहे. सर्वात कमी वयाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही नितीन नबीन यांची नोंद घेतली जात असून, त्यांच्या नेतृत्वाकडे पक्षातील कोट्यवधी कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Mayor of Mumbai : 31 जानेवारीला मुंबईचा महापौर निवडण्याची शक्यता

राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीनंतर नितीन नबीन यांनी सर्व नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत पक्षाच्या विचारधारेनुसार देशसेवेसाठी काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. आगामी काळात संघटन मजबूत करणे, निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देणे आणि केंद्र व राज्यातील सरकारांच्या कामगिरीला बळ देणे, हे त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हान असणार आहे.