व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र O Womaniya : नागपुरात धावणार गुलाबी ई-रिक्षा!

O Womaniya : नागपुरात धावणार गुलाबी ई-रिक्षा!

877 women applied for Pink e-rickshaw : ८७७ महिलांनी केले अर्ज; मंजुरीची प्रक्रिया सुरू

रिक्षा चालविणे फक्त पुरुषांचेच काम आहे, ही समज अनेक वर्षांपूर्वी महिलांनी खोडून काढली आहे. पुरुष जी रिक्षा चालवतात तीच रिक्षा महिलाही चालवतात. बरेचदा रिक्षा कोण चालवत आहे, हे देखील जाणीवपूर्वक बघितल्याशिवाय कळत नाही. पण आता महिला रिक्षाचालकांचे वेगळे अस्तित्व नागपूरकरांना दिसणार आहे. कारण नागपूरच्या रस्त्यांवरून गुलाबी ई-रिक्षा धावणार आहे.

लाडकी बहीण योजनेसोबतच राज्य शासनाने पिंक ई-रिक्षा योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागपूर जिल्ह्यातून ८७७ महिलांनी अर्ज केले आहेत. यातील २०९ अर्ज पात्र ठरले आहेत. १०२ अर्जांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली. पिंक ई-रिक्षा योजनेचा लाभ राज्यातील गरीब महिलांना मिळणार आहे. ज्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत, त्यांना ही पिंक ई-रिक्षा मिळणार आहे.

सरकार करेल २० टक्के खर्च
विशेष म्हणजे, या पिंक रिक्षाची २० टक्के रक्कम सरकार भरणार आहे. १० टक्के रक्कम अर्जदार महिलांना भरावी लागणार आहे. उरलेली ७० टक्के रक्कम बँकेच्या कर्जाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल. पाच वर्षांत कर्जाची परतफेड करता येईल. ज्या महिला महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत, त्या या योजनेस पात्र ठरणार आहेत. या महिलांकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. आणि महाराष्ट्रातील रहिवासी पुरावाही आवश्यक आहे.

वार्षिक उत्पन्नाची अट
या महिलांकडे आधार कार्ड, मोबाइल नंबर, बँक खाते असणे गरजेचे आहे. २० ते ४० वयोगट असणाऱ्या महिलांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. लाभार्थी महिलांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा अधिक नको. निराधार आणि दारिद्र्यरेषेखालील महिलांना प्राधान्य देण्यात येईल, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

error: Content is protected !!