Unease among big leaders after Ajit Pawar exi what really happening behind the scenes : अजित पवारांच्या एक्झिटनंतर बड्या नेत्यांमध्ये अस्वस्थता, पडद्यामागे नेमकं काय घडतंय
Mumbai : राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावी नेते अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. भीषण विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर संपूर्ण राज्य हळहळले असतानाच, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवान आणि अनपेक्षित राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे. विशेषतः दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांमुळे सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, काही बड्या नेत्यांच्या मनात अनामिक भीती निर्माण झाल्याचीही चर्चा रंगू लागली आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या दोन दिवसांत मुंबईत घडलेल्या घडामोडींनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. सव्वातास चाललेल्या या चर्चेत सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी संधी देण्याचा आणि राष्ट्रवादीकडे असलेली मंत्रीपदे कायम ठेवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याची माहिती समोर आली. यानंतरच सुनेत्रा पवार आज सायंकाळी पाच वाजता राजभवनावर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे निश्चित झाले.
Sharad Pawar : अजितदादांची इच्छा पूर्ण व्हावी, आज अजित असते तर फिल्डवरच दिसले असते
मात्र, हा शपथविधी इतक्या घाईघाईत का करण्यात येतोय, याबाबत राजकीय गोटात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांनीच काही नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली असून, त्यातूनच शपथविधी लवकर उरकण्याचा निर्णय पुढे रेटला गेला, अशी चर्चा आहे. अजित पवार गटातील काही नेत्यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आपले राजकीय वजन आणि अस्तित्व धोक्यात येईल, अशी भीती वाटत असल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांचे नाव केवळ उपमुख्यमंत्रीपदापुरते मर्यादित न राहता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीही चर्चेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्याचबरोबर पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याबाबतही हालचाली सुरू असून, त्यांचीही तशी इच्छा असल्याचे समजते. या सगळ्या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्तासंतुलन वेगाने बदलत असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी घेतलेली पत्रकार परिषद विशेष महत्त्वाची ठरली. गेल्या चार महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा सुरू होत्या, अशी माहिती त्यांनी दिली. या चर्चांचे नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील करत होते आणि 12 फेब्रुवारी रोजी या निर्णयाची औपचारिक घोषणा करण्याचे नियोजन होते, असा गौप्यस्फोटही शरद पवारांनी केला. मात्र, अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे या चर्चांना अचानक खीळ बसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, 17 जानेवारी रोजी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात विलिनीकरणासंदर्भात थेट चर्चा झाली होती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, अशी खात्री अनेकांना वाटत होती. मात्र, अचानक घडलेल्या दुर्घटनेनंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. आता दोन्ही पक्ष एकत्र येऊ नयेत, अशी भूमिका काही नेते पडद्यामागे घेत असल्याचेही संकेत मिळत आहेत. त्यामुळेच शपथविधीचा निर्णय घाईघाईत घेण्यात आला, अशी चर्चा अधिक बळावू लागली आहे.
एकीकडे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण आणि सत्तासंघर्ष उघड होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य काय असेल आणि या वेगवान घडामोडी कोणत्या दिशेने जातील, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
___








