Babanrao Taywade’s attack on leaders : बबबनराव तायवाडेंचा नेत्यांना टोला
Nagpur : मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसींचं आरक्षण संपणार अशी चर्चा रंगवली जात आहे. ओबीसी नेते मात्र या दाव्याला फेटाळत आहेत. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी नागपुरात स्पष्टपणे सांगितलं की, “2 सप्टेंबरच्या जीआरमुळे ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का बसलेला नाही. चुकीचे संदेश पसरवून समाजात भीतीचं वातावरण निर्माण करू नका. आम्ही ओबीसींच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्यास पूर्ण सक्षम आहोत,” असा ठाम दावा त्यांनी केला.
तायवाडेंच्या वक्तव्याने राजकीय नेत्यांना मिरच्या झोंबणार आहेत, कारण त्यांनी आंदोलनावरून ‘पोळी भाजणाऱ्या’ नेत्यांना चांगलाच टोला लगावला. “भरत कराड या तरुणाने आरक्षणाच्या भीतीपोटी आत्महत्या केली. हा प्रकार अत्यंत दुःखद आहे. पण अशा प्रसंगी नेत्यांनी समाजाचे मनोधैर्य वाढवायला हवं, उलट गोंधळ पसरवणं थांबवलं पाहिजे,” अशी जळजळीत टीका त्यांनी केली.
Maharashtra politics : अजितदादांवर पुन्हा बोललात तर जीभ हासडू !
तायवाडे म्हणाले, “मराठा समाजातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांना जशी मदत आणि नोकरीचं आश्वासन दिलं जातंय, तसंच ओबीसी समाजातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांनाही दिलासा मिळायला हवा. सरकारने तत्काळ मदतीची घोषणा करावी.” छगन भुजबळ यांच्या मेळाव्यावरही तायवाडेंनी प्रतिक्रिया दिली. “साठ टक्के समाज असल्याने अनेक नेते असणं स्वाभाविक आहे. मेळावे झाले तर त्याचं स्वागत आहे. पण त्या मेळाव्यातून मनोधैर्य वाढलं पाहिजे. निराशा पसरली तर त्याचा फायदा कुणालाच होणार नाही,” असं त्यांनी म्हटलं.
Local Body Elections : काँग्रेसचा पारंपरिक गड, भाजपची वाढती ताकद
“गैरसमज पसरवणारे कोण, सगळ्यांना माहिती आहे”
तायवाडेंनी राजकीय नेत्यांवर चिमटा काढला. “मराठा आणि ओबीसी आरक्षणाविषयी गैरसमज कोण पसरवतंय हे सर्वांना ठाऊक आहे. लोकांचा विश्वास नेत्यांवर असतो आणि म्हणूनच गोंधळ होतो. राजकारणासाठी समाजाची दिशाभूल केली जाते. मी राजकारणी नाही, समाजसेवी आहे. माझ्या आंदोलनामुळे सरकारने 58 जीआर काढले आहेत, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं,” असा टोलाही त्यांनी लगावला.
“ओबीसींचं आरक्षण संपलेलं नाही आणि ते संपणारही नाही. तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये. एकत्र या, हिमतीने लढा द्या. समाजाचं मनोधैर्य वाढवणं हीच खरी नेत्यांची जबाबदारी आहे.” असेही त्यांनी स्पष्ट केले.
___








