OBC Reservation : आरक्षणाच्या प्रश्नावर राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक !

National OBC Federation Gears Up for Aggressive Stand on Reservation : कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतून दुसऱ्या समाजाला आरक्षण देऊ देणार नाही

Nagpur : ओबीसींच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आंदोलन करण्यासाठी त्यांनी अंतरवली सराटी येथून मुंबईची वाट धरली आहे. आपल्या कोट्यातून इतर कोणत्याही समाजाला आरक्षण देण्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा कडवा विरोध आहे. आजवर शांत बसलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाने हालचाली सुरू केल्या आहेत. आरक्षणाच्या प्रश्नावर महासंघाने आक्रमक होण्याची तयारी केली आहे.

यासंदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आपल्या आरक्षणासाठी आम्ही आक्रमक भूमिका घेणार आहो. त्यासाठी येत्या शनिवारपासून (३० ऑगस्ट) नागपूरच्या संविधान चौकात साखळी उपोषण आंदोलन सुरू करणार आहोत. कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या कोट्यातून दुसऱ्या कोणत्याही समाजाला आरक्षण देऊ नये, अशी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी आहे. हा निर्णय महासंघाच्या नागपूर येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

Maratha movement : …तर त्यांचं मोठं नुकसान होईल!

ओबीसींच्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष करू नये. यासाठी आता राज्यव्यापी लढा उभारला जाणार आहे, अशी घोषणा डॉ. बबनराव तायवाडे यांनी केली. महासंघाने महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार परिषद घेऊन नागपुरातील आंदोलनाबाबत जनजागृती करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईकडे मोर्चा कधी वळवायचा, याचा अंतिम निर्णय नागपुरातील साखळी उपोषण संपल्यानंतर घेण्यात येईल. मात्र या लढ्यातून आता माघारी हटणार नाही, असेही डॉ. बबनराव तायवाडे यांनी ठणकावून सांगितले.