OBC March to Proceed Despite CM Fadnavis’s Appeal, Says Vijay Wadettiwar : २ सप्टेंबरचा जीआर रद्द झाल्याशिवाय माघार नाहीच
Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईतील सह्यांद्री अतिथीगृहात ओबीसी संघटनांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत संघटनांच्या मागण्या मान्य न झाल्याने ओबीसी संघटना १० ऑक्टोबर रोजी काढल्या जाणार असलेल्या मोर्चावर ठाम आहेत. राज्यावर ओढावलेली पूर परिस्थिती पाहता संघटनांनी मोर्चा काढू नये, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली होती. पण ओबीसी संघटनांनी ती विनंती धुडकावून लावली आहे. त्यामुळे ओबीसींचा मोर्चा निघणार, हे निश्चित झाले आहे.
२ सप्टेंबर रोजी काढलेला जीआर रद्द करावा, सन २०१४ पासून दिलेली कुणबी प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र याची श्र्वेतपत्रिका काढावी या दोन प्रमुख मागण्या ओबीसी संघटनांनी केल्या होत्या. सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबरचा मोर्चा निघणारच, अशी ठाम भूमिका काँग्रेसचे विधिनंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली आहे.
Nitesh Rane : जिल्हा बँक कर्ज घोटाळ्यात नितेश राणेंवर थेट आरोप
२ सप्टेंबर रोजी काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाजाच्या हक्कांच्या आरक्षणाला धक्का लागणार आहे. गावपातळीवर अनेक ठिकाणी खाडाखोड करून प्रमाणपत्र तयार केले जात आहेत. यंत्रणांवर दबाव टाकून प्रमाणपत्र बनवले जात आहेत. मराठवाड्यात दोन समाजांत वितुष्ट निर्माण झाले आहे. दोन समाजांतील लोक एकमेकांकडील लग्न समारंभांना जाण्याचे टाळत आहेत. शाळांमधून विद्यार्थ्यांना काढायला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात द्वेषाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या गतीने प्रमाणपत्र वाटली जात आहेत, त्यातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला प्रतिनिधीत्व राहणार नाही, असा धोक्याचा इशारा वडेट्टीवार यांनी समाजबांधवांना दिला आहे.
RSS Vijayadashami Celebration : एक तासाची नित्य शाखा, हेच संघाचे बलस्थान !
सरकारच्या दोन सप्टेंबरच्या जीआरनंतर राज्यात १२ ओबीसी तरूणांनी आत्महत्या केल्या आहेत. आपले भविष्य आता उरले नाही, अशी असुरक्षिततेची भावना ओबीसी समाजात निर्माण झाली आहे. काही ठिकाणी दोन समाजांत हिंसाचाराच्या घटनाही घडल्या आहेत. महाराष्ट्रात समाजा-समाजांत दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे २ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी आम्ही हा मार्चा काढणारच असा निर्धार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.