maharashtra-tax-relief-scrap-old-vehicles-buy-new-environment-tax-double : १ एप्रिलपासून महाराष्ट्रात नवे नियम लागू
Mumbai: महाराष्ट्रात शहरांमधील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जुनी वाहने मोडीत काढून नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांना करसवलत देण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ही नवी तरतूद १ एप्रिलपासून लागू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्यातील प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने जुन्या वाहनांवर आकारला जाणारा पर्यावरण कर दुप्पट करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. बीएस-४ आणि त्याखालील प्रदूषण मानके असलेल्या खासगी वाहनांवर पर्यावरण कर वाढवण्यात येणार आहे. मात्र दुसरीकडे जुने वाहन मोडीत काढून नवीन वाहन घेणाऱ्यांना करसवलत देऊन प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारच्या निर्णयानुसार जुन्या दुचाकी वाहनांवरील पर्यावरण कर २ हजार रुपयांवरून ४ हजार रुपये करण्यात आला आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या हलक्या मोटार वाहनांसाठी म्हणजेच कारसाठीचा पर्यावरण कर ३ हजार रुपयांवरून ६ हजार रुपये करण्यात आला आहे. तर डिझेल कारवरील पर्यावरण कर साडेतीन हजार रुपयांवरून ७ हजार रुपये करण्यात आला आहे.
lpg shortage : इराण युद्धाचे भारतालाही चटके; एलपीजी तुटवड्याची शक्यता
याशिवाय बीएस-४ प्रदूषण मानके असलेले वाहन मोडीत काढून नवीन वाहन खरेदी केल्यास मोटार वाहन करामध्ये १६ टक्के सवलत मिळणार आहे. तर बीएस-३ किंवा त्याखालील प्रदूषण मानके असलेले वाहन मोडीत काढून नवीन वाहन घेतल्यास मोटार वाहन करामध्ये ३० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे.
दरम्यान, दस्त नोंदणीमध्ये कमी मुद्रांक शुल्क भरून होणाऱ्या गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली आहेत. कमी मुद्रांकावर दस्त नोंदणी केल्यास होणाऱ्या दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. पूर्वी ५ हजार रुपयांचा असलेला दंड आता वाढवून एक लाख रुपयांपर्यंत करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे प्रदूषण नियंत्रणाबरोबरच राज्याच्या महसूलातही वाढ होईल, अशी अपेक्षा सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे.








