arvind-sawant-matoshree-meeting-operation-tiger-uddhav-thackeray-shinde-politics : अरविंद सावंत मुंबईत दाखल होताच मातोश्रीवर तातडीची बैठक, ठाकरे गट सतर्क
Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांमुळे पुन्हा खळबळ उडाली असून, या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने हालचालींना वेग दिला आहे. उद्धव ठाकरे गटाचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत मुंबईत दाखल होताच त्यांना तातडीने मातोश्रीवर बोलावण्यात आले आहे. ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून, या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील आठ खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. हे खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करू शकतात, अशा बातम्यांनी राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर सावंत यांना मातोश्रीवर बोलावण्यात आल्याने या चर्चांना अधिकच उधाण आले आहे.
दरम्यान, काही वृत्तांनुसार अरविंद सावंत आणि इतर काही खासदारांची ठाण्यात बैठक झाल्याचेही म्हटले जात होते. मात्र, या सर्व चर्चांवर सावंत यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. “मी उद्धव ठाकरे आणि शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. मुंबईत परतताच ते थेट मातोश्रीकडे रवाना झाले असून, पुढील राजकीय रणनीतीबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
Earthquake : महाराष्ट्र हादरला; विदर्भ आणि मराठवाड्यात सौम्य भूकंपाचे धक्के !
अरविंद सावंत हे २०१४ पासून दक्षिण मुंबईतून लोकसभेवर निवडून येत असून, ते तिसऱ्यांदा खासदार आहेत. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. याआधीही अधिवेशन काळात उद्धव ठाकरे यांनी खासदारांची मातोश्रीवर बैठक घेऊन मार्गदर्शन केले होते.
दुसरीकडे, या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी कथित बैठकीच्या वृत्तांचे खंडन केले आहे. “उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांसोबत झालेल्या बैठकीच्या बातम्या पूर्णपणे निराधार आणि खोडसाळ आहेत. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. गेल्या काही काळापासून खासदार फुटणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, मात्र त्यात कोणतेही तथ्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
Sharad pawar : वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांची घुसखोरी
सध्याच्या परिस्थितीत ठाकरे गटातील हालचालींना वेग आला असून, ऑपरेशन टायगरच्या चर्चांमुळे राज्यातील राजकारणात पुढील काही दिवसांत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








