Ambadas Danves serious allegation that land worth 1800 crores was purchased for only 300 crores : १८०० कोटींची जमीन फक्त ३०० कोटींना विकत घेतल्याचा अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
Dharashiv : राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा माजी विरोधी पक्षनेते विधान परिषद अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर केला आहे. धाराशीव दौऱ्यावर असताना त्यांनी पार्थ पवार यांच्यावर तब्बल १८०० कोटी रुपयांच्या जमिनीचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.
दानवे यांच्या म्हणण्यानुसार, पार्थ पवार यांच्या कंपनीने ही जमीन केवळ ३०० कोटी रुपयांना विकत घेतली असून या व्यवहारासाठी केवळ ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले गेले. मुळ मालकांना विश्वासात न घेता आणि सातबारा दुरुस्त न करता हा व्यवहार करण्यात आला, असा दावा त्यांनी केला आहे. दानवेंच्या म्हणण्यानुसार, उद्योग संचालनालयाने या व्यवहारासाठी फक्त ४८ तासांत मुद्रांक शुल्क माफ केले आणि केवळ २७ दिवसांत संपूर्ण व्यवहार पूर्ण झाला.
Local Body Elections : पालिका रणसंग्रामात ‘गठबंधनां’चा गोंधळ!
पार्थ पवार पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. “केवळ एक लाख रुपयांच्या भांडवलावर चालणारी कंपनी एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन कशी खरेदी करू शकते?” असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केला.
दानवेंनी टीकेची झोड उठवत विचारले, “राज्यातील परिस्थिती पाहता देवभाऊ म्हणावं की मेवाभाऊ म्हणावं? अजित पवारांचे चिरंजीव दोन दिवसांत जमीन घेतात, अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटींना घेतात आणि स्टँप ड्युटी फक्त पाचशे रुपये भरतात. मग शेतकऱ्यांना फुकट काही लागतं, पण तुम्हाला जमीन फुकट का लागते?” असा टोला त्यांनी लगावला.
Local Body Elections : मान मिळाला नाही तर स्वबळावर लढू, वंचितचा इशारा
त्यांनी पुढे विचारले, “भू संपादन झालेली जमीन परत कशी मिळते? महार वतनाची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीला कशी मिळाली? कोणता नियम पाळला गेला? याचा खुलासा पार्थ पवार यांनी करावा.” दानवेंनी सरकारवर टीका करत म्हटले की, “मंत्रालयात सर्वसामान्यांच्या फाईल्स महिनोंमहिने अडकतात, पण पार्थ पवारांची फाईल दोन दिवसांत कशी मंजूर झाली? राज्य लुटण्याचा प्रकार सुरू आहे.”
अंबादास दानवेंनी पार्थ पवार आणि अजित पवार या दोघांकडून स्पष्ट खुलासा करण्याची मागणी केली आहे. या गंभीर आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चा रंगली आहे.
_____








