Mahayuti & MVA disturbed due to internal disputes : युती-आघाडी अंतर्गत भांडणांमुळे अस्वस्थ, भाजप आक्रमक तर काँग्रेस सज्ज
Buldhana जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजताच राजकीय वातावरण तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये अंतर्गत सुसंवाद साधण्याची धडपड सुरू असून, “दोन्ही आघाड्या खरोखरच एकसंघपणे लढतील का?” हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेचा प्रमुख विषय ठरला आहे.
या रणधुमाळीत २९७ जागांसाठी (२८६ नगरसेवक आणि ११ नगराध्यक्ष) साडेचार लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रत्येक पक्षासमोर जागावाटपाचे गणित, गटबाजी आवरण्याचे आव्हान आणि स्थानिक स्तरावरील नाराजीचे समाधान हे तिहेरी आव्हान उभे आहे.
आचारसंहिता लागू होताच भाजपने निवडणूक रणनितीचा वेग वाढवला आहे. १३ ऑक्टोबर रोजी अमरावतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर पक्षाने सर्व ११ नगरपालिकांसाठी नगराध्यक्षपदाच्या इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण केल्या आहेत.
Local Body Elections : मान मिळाला नाही तर स्वबळावर लढू, वंचितचा इशारा
“सोबत आले तर स्वागत, नाही आले तर स्वबळावर लढू,” अशा भूमिकेची झलक भाजपच्या हालचालींमधून स्पष्टपणे दिसत आहे. परिणामी महायुतीतील शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित गट) यांच्यासमोर भाजपच्या गतीशी जुळवून घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने उमेदवार निवडीचा प्रारंभ केला असून, ५ नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. गेल्या निवडणुकीत ८३ नगरसेवक निवडून आणणाऱ्या काँग्रेसने यंदाही जोश कायम ठेवण्याचा निर्धार केला आहे. ७ नोव्हेंबर रोजी आघाडीच्या शीर्ष नेत्यांची बैठक होणार असून, त्यात जागावाटप आणि स्थानिक युतीबाबतचा अंतिम निर्णय होईल.
Local Body Elections : निवडणूक जाहीर झाली, पोलीस दलात मोठे बदल!
भाजपच्या आक्रमक मोहिमेच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेने मेहकर येथे जिल्हास्तरीय प्रशिक्षण मेळावा घेतला. सुमारे अडीच हजार पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महायुतीच्या विजयाचा निर्धार करण्यात आला. मात्र, उमेदवार निश्चिती आणि प्रभागनिहाय नियोजनात शिंदेसेना अजूनही काहीशी मागे असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. पक्षातील गटबाजी आणि स्थानिक नेत्यांतील समन्वयाचा अभाव ही शिंदेसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
APMC : राणा विरुद्ध नाना, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर राजकीय रणकंदन!
भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी आपल्या सहयोगी पक्षांवर दबावतंत्र वापरण्याची रणनीती आखल्याचे बोलले जात आहे. “स्वबळावर आम्ही सक्षम आहोत,” असा संदेश दोन्ही पक्षांनी आपल्या गोटांना दिला आहे. भाजपच्या वेगवान हालचालींमुळे महायुतीत ताण निर्माण झाला आहे, तर काँग्रेसच्या सक्रियतेमुळे एमव्हीएमध्येही अस्वस्थता वाढल्याचे संकेत आहेत.
जिल्ह्यातील राजकीय चित्र पाहता दोन्ही आघाड्या “एकसंघ” दिसण्याऐवजी आतूनच परस्परविरोधी झुंज देत आहेत. पक्षांतर्गत नाराजी, जागावाटपाचा गोंधळ आणि स्थानिक गटबाजी या सगळ्याचा निकाल पुढील चार-पाच दिवसांत स्पष्ट होणार आहे. पालिका रणसंग्रामात कोण एकसंघ राहील आणि कोण गोंधळात पडेल, हेच आता पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.








