Nagpur-Pune flight delayed, diverted to Hyderabad : नागपूर – पुणे फ्लाइटला उड्डाण विलंब, थेट हैदराबादला उतरवून डांबले
Nagpur : नागपूरातून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी इंडिगो एअरलाईन्सचा गुरुवार रात्रीचा प्रवास अक्षरशः त्रासदायक आणि संतापजनक ठरला. नियोजित वेळेनुसार रात्री ११:४० वाजता उड्डाण होणे अपेक्षित असतानाही ही फ्लाइट तब्बल एक वाजेपर्यंत नागपूर विमानतळातून उड्डाण घेऊ शकली नाही. विलंबानंतर अखेर विमान हवेत झेपावले; परंतु फक्त अर्धा तास प्रवास झाल्यानंतरच विमानातील क्रूने प्रवाशांना माहिती दिली की पुणे विमानतळावर लँडिंगसाठी परवानगी मिळत नाही आणि तेथे लँड होण्यासाठी जागा उपलब्ध नाही. ही माहिती देत इंडिगो व्यवस्थापनाने फ्लाइट सरळ हैदराबाद विमानतळावर उतरविली, ज्यामुळे नागपूर – पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये चिंतेची लाट पसरली.
हैदराबादला लँडिंग झाल्यानंतरही प्रवाशांची बिकट परिस्थिती संपली नाही. सुमारे एक तास प्रवाशांना विमानाबाहेर पडू न देता आतच बसवून ठेवण्यात आले. परिस्थिती असह्य झाल्यानंतर काही प्रवाशांनी विरोध दर्शवला, त्यानंतरच त्यांना टर्मिनलमध्ये बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली. अद्यापही नागपूरचे अनेक प्रवासी पुणे गाठण्यासाठी हैदराबाद विमानतळावर अडकले असून पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल का याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, वाराणसीवरून पुण्याला जाणारी आणखी एक फ्लाइटही हैदराबादलाच उतरविण्यात आली आहे आणि तेथील प्रवाशांनाही त्याच परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
Local Body Elections : मतदान प्रक्रियेत अडथळा, पोलीस अधिकाऱ्यास धक्काबुक्की
दरम्यान पुणे विमानतळावरही मोठा गोंधळ निर्माण झाला असून प्रवाशांचा संताप उफाळून आला आहे. इंडिगोकडून कोणतीही ठोस माहिती न मिळाल्यामुळे प्रवासी अक्षरशः अंधारात ठेवले गेल्याची भावना व्यक्त होत आहे. अनेक प्रवासी रात्री १० वाजल्यापासून विमानतळावर फ्लाइटच्या प्रतीक्षेत थांबून आहेत, परंतु वेळा वारंवार बदलल्या जात असल्याने अस्वस्थता वाढत आहे. या अव्यवस्थेमुळे प्रवाशांचे महत्वाचे कार्यक्रम बिघडले आहेत; कोणाला लग्नसमारंभाला पोहोचायचे होते, कोणाला प्रवासावर जायचे होते, तर एका प्रवाशाने वडिलांच्या निधनामुळे तातडीने पुण्यात पोहोचण्याची गरज होती मात्र परिस्थितीमुळे त्यांनाही अडचणींना सामोरे जावे लागले.
Shivsena Uddhav Balasaheb Thackeray : घरकरातील ५०% सवलतीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष?
इंडिगोच्या अव्यवस्थेमुळे पुणे विमानतळावर इतर विमान कंपन्यांचीही अडचण वाढली आहे. विमानतळावर इंडिगोची नऊ विमानं उभी राहिल्याने लँडिंग आणि पार्किंगची जागा कमी पडली, परिणामी मागील दोन दिवसांमध्ये तब्बल ३८ फ्लाइट्स रद्द झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आणि आणखी काही विमानं अजूनही टर्मिनल परिसरातच उभी असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रवासी मनस्ताप, वेळेचे नुकसान आणि नियोजन बिघडविणारी ही घटना विमान वाहतूक व्यवस्थापनातील गंभीर त्रुटींवर बोट ठेवत असून इंडिगो एअरलाईन्सकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे.








