Pawar wealth : आजोबांपेक्षा नातू श्रीमंत! राज्यसभा प्रतिज्ञापत्रात उघड झाली पार्थ पवारांची संपत्ती

sharad-pawar-parth-pawar-wealth-affidavit-rajya-sabha-election-2026 : शरद पवारांपेक्षा जास्त मालमत्ता

Mumbai: महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत यंदा एक वेगळीच बाब समोर आली आहे. पवार घराण्यातील आजोबा आणि नातू दोघेही राज्यसभेवर निवडून गेले असून त्यांच्या संपत्तीबाबतही चर्चेला उधाण आले आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवार तर महायुतीकडून पार्थ पवार राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून पार्थ पवार हे त्यांच्या आजोबा शरद पवारांपेक्षा अधिक श्रीमंत असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यसभा निवडणूक २०२६ अंतर्गत महाराष्ट्रातील सातही जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले. ६ मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्व उमेदवारांनी आपल्या मालमत्तेचा तपशील निवडणूक आयोगाकडे सादर केला होता. या प्रतिज्ञापत्रानुसार शरद पवार आणि त्यांची पत्नी प्रतिभा पवार यांच्या नावे एकूण ६० कोटी ७१ लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर पार्थ पवार यांच्या नावे एकूण ८८ कोटी ३३ लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाले आहे.

Akola airport : आधी हवेत घोषणा, आता अर्थसंकल्पात ‘लँडिंग’

शरद पवार यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे सुमारे ४४ कोटी ७२ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्याकडे १ लाख २५ हजार रुपयांची रोख रक्कम असून बँका व वित्तसंस्थांमधील मुदत ठेवी सुमारे ११ कोटी ६६ लाख रुपये आहेत. समभाग आणि म्युच्युअल फंडामध्ये जवळपास २७ कोटी रुपयांची गुंतवणूक असून सोने-चांदीच्या दागिन्यांची किंमत सुमारे ३ कोटी ८५ लाख रुपये आहे. बारामतीतील शेती, घर आणि सदनिका यांसारख्या स्थावर मालमत्तेचे अंदाजे मूल्य सुमारे १५ कोटी ९९ लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय सुप्रिया एंटरप्रायजेसकडे सुमारे ४९ लाख ८४ हजार रुपयांचे दायित्व असल्याची माहितीही प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.

दुसरीकडे पार्थ पवार यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे सुमारे ११ कोटी ३५ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. बँका, टपाल विभाग आणि वित्तसंस्थांमध्ये ३ कोटी ६८ लाख रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. समभाग आणि म्युच्युअल फंडांमध्ये सुमारे १ कोटी १७ लाख रुपयांची गुंतवणूक आहे, तर सोने-चांदीच्या दागिन्यांची किंमत सुमारे १ कोटी ३१ लाख रुपये आहे. बारामती तालुक्यातील शेतजमिनी आणि पुण्यातील घर यांसह त्यांच्या स्थावर मालमत्तेचे अंदाजे मूल्य सुमारे ७६ कोटी ९८ लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय बँका किंवा वित्तीय संस्थांचे सुमारे ९२ लाख ४८ हजार रुपयांचे कर्ज असल्याची माहितीही प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे.

Kharif season : खरेदीचे उद्दिष्ट संपले, पण शेतकऱ्यांचा माल घरातच!

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या या आकडेवारीमुळे पवार कुटुंबातील संपत्तीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.