Pm yojana audit : मोठा निर्णय, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे राज्यभर ऑडिट

maharashtra-pm-poshan-shakti-nirman-yojana-audit-4325-schools-education-department-decision : ४,३२५ शाळांची तपासणी, २.४२ कोटींचा निधी मंजूर

Mumbai : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेबाबत शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत राज्यातील सुमारे ४,३२५ शाळांचे ऑडिट करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पाच टक्के शाळांची निवड करून सविस्तर पडताळणी केली जाणार असून यासाठी सुमारे २ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे.

या ऑडिटमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराची नियमितता, अन्नाचे प्रमाण आणि पौष्टिकता, स्वयंपाकासाठी लागणाऱ्या भांड्यांची उपलब्धता, स्वयंपाकगृह व धान्य साठवण व्यवस्था, भोजन तयार करण्याचा खर्च यांची तपासणी केली जाणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहांची स्थिती, हात धुण्यासाठी साबणाची उपलब्धता, स्वयंपाकी व मदतनीसांचे मानधन, भोजन तपासणी नोंदवही आणि विद्यार्थी मदतनीसांच्या आरोग्य नोंदींचीही छाननी केली जाणार आहे.

Rajya sabha elections : माजी महापौर मायाताई इवनाते होणार खासदार, भाजपचे धक्कातंत्र

ऑडिट पूर्ण झाल्यानंतर संबंधित अहवाल शिक्षण संचालकांकडे सादर करणे बंधनकारक राहणार आहे. त्यानंतर हा अहवाल राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Rajyasabha election : शरद पवारांवरून पेच; उमेदवारी न दिल्यास भाजप पाचवा उमेदवार देणार?

केंद्र सरकारने देशातील गरजू विद्यार्थ्यांच्या पोषणस्थितीत सुधारणा व्हावी या हेतूने ही योजना सुरू केली आहे. देशभरातील कोट्यवधी विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ होत असल्याचा दावा करण्यात येतो. राज्यातील शाळांमध्ये या योजनेची काटेकोर अंमलबजावणी होत आहे का, याची खातरजमा करण्यासाठी आता व्यापक ऑडिट मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे शालेय पोषण व्यवस्थेतील त्रुटी समोर येण्याची तसेच सुधारणा प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.