Pmc election: सोशल मीडिया ट्रोलिंगनंतर भाजपाच्या उमेदवार पूजा मोरे यांची माघार

Controversy over alleged statements against Pahalgam attack, CM Fadnavis : पहलगाम हल्ला आणि मुख्यमंत्री फडणवीसांवरील कथित विधानांवरून वाद

Pune : पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मधून भाजपाच्या अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर झालेल्या पूजा मोरे-जाधव यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत सोशल मीडियावर सुरू झालेल्या तीव्र ट्रोलिंगमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या काही जुन्या कथित विधानांचे व्हिडीओ आणि पोस्ट पुन्हा व्हायरल करत थेट भाजप नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

पूजा मोरे–जाधव यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात मोहिम उघडली गेली. मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळातील तसेच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरच्या कथित विधानांचा संदर्भ देत त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पूजा मोरे – जाधव आणि त्यांचे पती धनंजय जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची अधिकृत घोषणा केली.

Municipal election: महायुतीची घोडदौड; ९ उमेदवार बिनविरोध

पत्रकार परिषदेत धनंजय जाधव यांनी सांगितले की, आम्ही सोशल मीडियाचे बळी ठरलो आहोत. माझ्या पत्नीने जे विधान केलेलेच नाही, ते शब्द तिच्या तोंडी घालण्यात आले. मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीबाबत जे विधान सांगितले जात आहे, ते पूजा मोरे यांनी केलेले नव्हते. तसेच पहलगाम हल्ल्यानंतर केलेल्या कथित विधानांबाबतही त्यांनी त्यावेळीच स्पष्टीकरण दिले होते, असे ते म्हणाले.

पूजा मोरे- जाधव या मूळच्या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील आहेत. लग्नापूर्वी त्या मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभागी होत्या. मूक मोर्चा आणि त्यानंतर झालेल्या विविध आंदोलनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. याच आंदोलनादरम्यान एका ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा दावा सोशल मीडियावरील काही हँडल्सवरून करण्यात आला. मात्र हे विधान आपले नसल्याचा ठाम दावा पूजा मोरे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस आम्ही आरक्षण मागतो, तुमची पत्नी मागत नाहीत, अशा आशयाचे विधान मी कधीच केलेले नाही. हे विधान बीडच्या परळी येथील एका तरुणीने केले होते, असा दावा पूजा मोरे यांनी केला आहे. तरीही हे विधान आपल्याशी जोडले गेल्याने मानसिक त्रास सहन करावा लागला, असे त्यांनी नमूद केले.

Municipal election: असंही नाराजी नाट्य… नवऱ्याने भाजपविरुद्ध बंडखोरी केली!

सोशल मीडियावरील वाढता दबाव, पक्षाची प्रतिमा आणि कुटुंबावर होणारे परिणाम लक्षात घेऊन आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे उमेदवार निवडीच्या प्रक्रियेसह सोशल मीडियाच्या प्रभावावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुणे महापालिका निवडणुकीच्या राजकारणात ही माघार मोठी घडामोड मानली जात आहे.